ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असलेले अध्यक्ष सभागृहाला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन

ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.९ : सभागृहातील शिस्त आणि योग्य वर्तन हे लोकशाहीचा सन्मान उंचावणारे आहेते. शिस्त आणि वक्तशीर या लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी ॲड.राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत.संवादातून,चर्चेतून लोकशाही समृद्ध होत असते. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम सभागृह करीत असते.ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आतापर्यंत चारच जणांना मिळाला आहे.ॲड.नार्वेकर यांना हा बहुमान मिळाला आहे. विधानसभा अध्यक्षांचे दालन सभागृहा तील सर्व पक्षांसाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही मतभिन्नता झाली तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते. अध्यक्ष दोन्ही बाजूंचे ऐकतात.यावेळीही अध्यक्षांकडे ही जबाबदारी आहे. लोकशाहीत प्रभावी विरोधी पक्ष हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.विधिमंडळात जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन लोकशाही अधिक सुदृढ होईल. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम या सभागृहात होते.सभागृहातील सदस्य महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतात. या सभागृहातील परंपरांचा मान – सन्मान निश्चितपणे कायम राहील.यापुढील काळातही नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनात सभागृहात व्यापक जनहिताचे निर्णय होतील.विधि मंडळाच्या प्रथा,परंपरा यांची उंची राखत सर्व सदस्यांना न्याय देण्याची भूमिका अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी त्यांच्या मागील अडीच वर्षाच्या काळात प्रामाणिकपणे पार पाडली असल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांना सांगितले.

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांची भूमिका समन्यायी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानसभेच्या सभागृहात प्रत्येक घटकाला समान न्याय देतानाच सामजिक समतोल राखत समन्यायी भूमिका घेवून कामकाजाची विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांची हातोटी आहे.सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांचे नाव विधीमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल उपमुख्यमंत्री श्री.शिंदे अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते. ॲड. नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज कौतुकास्पद आहे. मागील अडीच वर्षात त्यांनी चांगले काम केले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अडीच वर्षात त्यांनी सखोल अभ्यास करून राज्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय दिले. त्यांनी अध्यक्षपदाची उंची अधिक वाढवली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर देशाचा,राज्याचा कारभार चालतो.राज्यात आता विकासाचे व प्रगतीचे नवे पर्व सुरु झाले आहे.अध्यक्षांच्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास नक्कीच होईल. या सभागृहाचे पावित्र्य राखत राज्याला विकासाच्या महामार्गावर नेण्यास सर्वांनी प्रयत्न करूया असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधिमंडळाचे सभागृह हे देशाला दिशा देणारे– उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर म्हणाले, महाराष्ट्र विधिमंडळाचे सभागृह हे देशाला दिशा देणारे सभागृह आहे. या सभागृहाचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. सभागृहाला संवेदनशील अध्यक्ष लाभले असल्याने त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात लोकहितकारी व परिणामकारक निर्णय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कायद्याची उत्तम जाण असणारे अध्यक्ष सभागृहाला लाभले आहेत. सभागृहासमोर आलेल्या प्रश्नांवर तितक्याच ताकदीने उत्तर देऊन त्यांनी सभागृह उत्तम चालविले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी विधानसभा सदस्य सर्वश्री जयंत पाटील,नाना पटोले, सुरेश धस,जितेंद्र आव्हाड,नितीन राऊत, विश्वजीत कदम, रोहित पाटील यांनीही अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top