पंढरपूर एमआयडीसी चे लवकरच भूमिपूजन : कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित
पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२२/०८/२०२४- पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एमआयडीसीच्या उभारणीला आता गती येणार आहे. लवकरच midc चे भूमिपूजन होणार असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, चार प्रमुख वाऱ्यांवर उदरनिर्वाह करणारे गाव अशीही पंढरपूरची ओळख आहे.पंढरपूर तालुक्यातील हजारो युवक रोजगाराच्या शोधात पुणे मुंबईला जातात. स्थानिक पातळीवर एमआयडीसी असावी अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात होती. मात्र आजवर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी एमआयडीसी मंजूर झाली नाही. बऱ्याच वेळी स्थानिक राजकारणाच्या कुरघोडीमुळे एमआयडीसी उभारणीत खोडा घातला जात होता.परंतु आ.समाधान आवताडे यांनी केवळ दोन वर्षात सातत्याने पाठपुरावा करून, कासेगाव हद्दीत एमआय डीसी मंजूर करून घेतली आणि आज दि. २१ ऑगस्ट पासून कासेगाव हद्दीतील गट नंबर १९४७/४,१९४७/६,१९४७/८ मधील हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून उद्योग मंत्रालयाने जाहीर केले आहे.त्यामुळे लवकरच पंढरपूर एमआयडीसी उभारणीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.येथील औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा पार पडला आहे.आ.समाधान आवताडे यांनी मागील दोन वर्षांपासून यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे.
कासेगाव हद्दीतील जागेचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळास पाठवला होता.औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासेगाव येथे येऊन जागेची पाहणी केली होती. त्यानंतर आ. आवताडे यांनी उद्योग मंत्रालय, औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता.
अखेर दि २१ रोजी उद्योग मंत्रालयाकडून राज्यपालांच्या आदेशानुसार ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. आ.समाधान आवताडे यांनी उद्योग मंत्रालयाचे सहसचिव संजय देगावकर यांच्याकडून हा अध्यादेश स्वीकारला आहे. त्यानंतर आ.आवताडे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचेही आभार मानले आहेत.
पंढरपूर येथील एमआयडीसी च्या उभारणीतील कासेगाव हद्दीतील जागा निश्चित केल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील हजारो बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे.शिवाय तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या औद्योगिक विकासाला ही चालना मिळणार आहे.

पंढरपूर तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून मी सार्वजनिक काम करतोय,या दरम्यान हजारो युवकांनी एमआयडीसी ची गरज बोलून दाखवली आणि मलाही याची गरज जाणवत होती. सुदैवाने पोटनिवडणुकीत जनतेने आमदार केले..त्यानंतर एमआयडीसी चां विषय मी प्राधान्याने हाती घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सहकार्यामुळे लवकरात लवकर हा विषय मार्गी लावता आला याचे समाधान आहे. जागा निश्चित झाली आहे आता लवकरच भूमिपूजन करू – आ.समाधान आवताडे
पंढरपूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालयांसह चांगल्या उच्च शिक्षण संस्था आहेत.त्यामुळे कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे.भीमा नदीमुळे एमआयडीसी करिता पाणी उपलब्ध आहे.शिवाय पंढरपूर शहर आणि तालुक्यात आता पक्क्या रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे.शिवाय रेल्वे सेवा पंढरपूर पर्यंत चालू आहे.त्यामुळे दर्शन एमआयडीसी उभारण्यासाठी पोषक परिस्थिती पंढरपूरमध्ये आहे,मात्र आजवरच्या राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता.
पंढरपूर शहर आणि तालुक्यात कुशल मनुष्यबळ, चांगली रस्ते कनेक्टीव्हीटी, रेल्वे सेवा, मुबलक पाणी, साखर कारखानदारी, फळ शेती असल्याने उद्योगासाठी पोषक वातावरण आहे..मात्र एमआयडीसी अभावी हजारो युवकांना रोजगार शोधत बाहेर जावे लागत होते.अनेकांना जागेअभावी उद्योग उभा करता आले नाहीत,काही उद्योजक तालुक्याबाहेर निघून गेले. मात्र आता एम आय डी सी मंजूर झाल्याने पंढरपूरच्या उद्योगाच्या विकासाला संधी मिळेल, रोजगार वाढेल -बाळकृष्ण सूर्यवंशी,
उद्योजक अनवली, पंढरपूर