लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणासाठी

लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणासाठी

महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणे आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्यापासून दरमाह ₹१५०० ची आर्थिक मदत मिळेल. हे पैसे महिलांना त्यांच्या वैयक्तिक आणि घरगुती खर्च चालविण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी आणि कुटुंबाच्या निर्णयांमध्ये अधिक सक्रियतेने योगदान देण्यासाठी आर्थिक आधार प्रदान करतील.

महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. त्यांना आर्थिक स्वावलंबन देऊन आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून शासनाची महिलांच्या सामाजिक- आर्थिक विकासातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते.

राज्य शासनाद्वारे ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आली आहे, या उपक्रमाचा महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक सहाय्यावर लक्ष केंद्रित करून, सरकार महिलांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

शासनाने या योजनेतून महिलांना आर्थिक मदतीबरोबरच त्यांचे आरोग्य, पोषण आणि आर्थिक व्यवस्थापनावर भर दिला आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि जास्तीत जास्त महिलांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी शासन आग्रही असून योजनेत अडचणीच्या ठरणाऱ्या अनेक अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा प्रमुख घटक म्हणून महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी राज्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांच्या मालिकेचा एक भाग ठरेल, यात शंका नाही.

– गजानन जाधव, जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top