गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता

पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०७/२०२४ – गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्याने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरु केला.
पोर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर ता.पंढरपूर येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे 5.00 वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली.

गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता

त्यानंतर भजन झाले. तर शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 4.00 वाजता गोपाळपूरात आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध सुमारे 400 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या.सकाळी 9.00 च्या सुमारास जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर 9.30 च्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या.

या पालख्यांसह संत सोपानकाका,संत मुक्ताबाई,संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज,संत निवृत्तीनाथ महाराज,संत निळोबाराय,चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले.

तत्पुर्वी गोपाळपुर येथील श्रीकृष्ण मंदीरात पहाटे 2.30 वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली.पूजा झाल्या नंतर पहाटे 3.15 वाजता श्रीकृष्ण मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.भाविकांनी मोठ्या श्रध्देने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्यावतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप करण्यात आले.

गोपाळपूर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच उज्वला बनसोडे, ग्रामसेविका ज्योती पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी पालख्यांचे व दिड्यांचे स्वागत केले.गोपाळपूर ग्रामपंचायती च्यावतीने स्वच्छ पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था,हिरकणी कक्ष,प्लॅस्टिक संकलन केंद्र,तात्पुरते शौचालय,निवारा शेड आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या सोहळ्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे,तालुका आरोग्याधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

गोपाळपूर येथील गोपाळ कृष्ण मंदीर समितीच्या वतीने मंदिरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार गोपाळ कृष्ण मंदिर समितीच्यावतीने गोपाळ कृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप गुरव यांच्या हस्ते करण्यात आला.

गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या श्री  विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्या व सर्व संताच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या.यावेळी देवाची आणि संताची अनुपम भेट घडवून आणण्यात आली. श्री विठ्ठल-  रुक्म‍िणी मातेचे दर्शन घेतल्यावर हा संतदेव भेटीचा सोहळा पार पडला.यानंतर पालख्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या.तत्पूर्वी मंदीर समितीच्यावतीने मंदीर समितीचे सदस्य ॲड.माधवी निगडे,संभाजी शिंदे,प्रकाश महाराज जंवजाळ, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी पादुकांचे पुजन व मानाच्या पालख्यांचे मानकरी यांचे उपरणे,श्रीफळ व हार देवून सत्कार केला. यावेळी यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता ।। म्हणत जड अंत:करणाने संताच्या पालख्यांनी व वारकऱ्यांनी  परतीचा प्रवास सुरु केला.

पंढरपूर येथील आषाढी यात्रेत भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल- रुक्मिणीमाता अहोरात्र उभे असतात.या कालावधीत देवाचे नित्योपचार बंद असतात.श्री विठ्ठलाचे नवरात्र असल्याने पलंग काढण्यात आलेला असतो.त्यामुळे येत्या शुक्रवारी ता.26 श्रींची प्रक्षाळपूजा करण्यात येणार आहे,अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top