सोलापूर:-सोलापूरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये विजेच्या कमी जास्त दाबामुळे शॉक सर्किट होवून लागणाऱ्या आगीवर उपाययोजने करीता शासनाने व प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावे-खासदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
सोलापूरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहत सोलापूर येथील टॉवेल कारखान्यांमध्ये आग लागून भीषण अग्नी तांडवांमध्ये उस्मान मन्सुरी,अनस मन्सुरी, शिफा मन्सुरी, युसुफ मन्सुरी,आशाबानो बागवान, हिना बागवान शेख, सलमान बागवान, मेहताब बागवान या मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबियांना या अतिशय दुःखद घटनेतून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना शक्ती द्यावी अशी प्रार्थना खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली की, सोलापूर येथील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांना वारंवार शॉक सर्किटमुळे लागणारी आग व त्यामुळे होणारे प्रचंड प्रमाणातले नुकसान याकडे शासन व प्रशासन गांभीर्याने लक्ष का देत नाही ? या भागात औद्योगिक वसाहत व नागरी वसाहतींना एकाच वीज उपकेंद्रामधून वीज पुरवठा केला जातो. विजेचा दाब कमी अधिक झाल्यानंतर शॉक सर्किट होवून कारखान्यांमध्ये आग लागण्याचे प्रकार या अगोदरही बऱ्याच वेळा झालेले आहेत. परंतु त्यामध्ये आतापर्यंत जीवित हानी झाली नव्हती. आज घडलेल्या घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झालेली आहे आता तरी शासनाचे व प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत की नाहीत. आज घडलेल्या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चार जण व चार कामगार अशा आठ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या भागात आम्ही महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून तात्पुरत्या स्वरूपाची अग्निशामक दलाची गाडी उभा करण्याची सोय केली होती जेणेकरून आग लागण्याची घटना घडल्यावर पहिली गाडी तत्काळ पोहोचू शकेल. तरी परंतु हि प्राथमिक सोय उपलब्ध असताना देखील आगीने ऐवढे रुद्र रुप कसे काय धारण केले याची चिंता वाटते.
आम्ही वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांबद्दल विधानसभेत आवाज उठवलेला आहे. तरीही शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही तसेच मनपा प्रशासनाने ही याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये वारंवार लागलेल्या आगीच्या घटनांचे लक्ष वेधून डी.पी.डी.सी 2023-24 च्या निधीमधून या भागामध्ये अग्निशामक केंद्र उभारण्याकरिता 1 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर करून घेतला व महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. तरी अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन केंद्राचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाचे या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास येत आहे.
विजेचा दाब कमी जास्त होऊन शॉक सर्किट होते व त्यामुळे कारखान्यांमध्ये आग लागते असा प्रकार काही वर्षापासून अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमध्ये होत असल्याने आम्ही महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी सोबत कारखनदारांची बैठक घेतली होती त्यामध्ये प्रकर्षाने या भागाचा विद्युत सोयी-सुविधांचा डीपीआर तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे परंतु शासनाच्या ऊर्जा विभागाकडून याला मंजुरी मिळालेली नाही असे समोर आल्यानंतर आम्ही ऊर्जा खात्याच्या सचिवांशी संपर्क साधला परंतु या भागातील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या डी पी आर ला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या डीपीआर ला तात्काळ मंजूर देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली आहे त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचण्याकरीता अडथळे निर्माण होतात व वेळेत गाडी न पोहोचल्यामुळे आग मोठ्याप्रमाणात पसरू लागते. मला मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीमधून रस्ते करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याची कामे मोठ्याप्रमाणावर असल्यामुळे शासनाच्या उद्योग किंवा नगरविकास विभागाकडून येथील पायाभूत सोयी-सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष निधी द्रयावा व ऊजा विभागाने या औद्योगिक वसाहतीचा विद्युत सोय-सुविधांचा डि.पी.आर. मंजूर करून त्यास तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा.