सबमरीन केबलमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान नव उपक्रमाच्या प्रगतीस चालना – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते म्यानमार,भारत, मलेशिया आणि सिंगापूर (MIST) यांना जोडणाऱ्या पाण्याखालील केबल यंत्रणेचा शुभारंभ
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एनटीटी डेटा गेटवे टू द वर्ल्ड कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्यानमार,भारत, मलेशिया आणि सिंगापूर (MIST) यांना जोडणाऱ्या पाण्याखालील केबल यंत्रणेचा शुभारंभ केला.
म्यानमार,मलेशिया,भारत आणि सिंगापूर (MIST) यांच्यातील पाण्याखालील (सबमरीन) केबल टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होत आहे.यामुळे भारताची डेटा संचारक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान नवोपक्रमांना चालना मिळणार आहे.याचा भारताच्या विकासावर सकारात्मक परिणाम होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एनटीटी कॉर्पोरेशन आणि एनटीटी डेटा यांनी ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगती, सबमरीन केबलचे कार्यान्वयन तसेच शाश्वतता आणि हरित ऊर्जेचे भविष्य या विषयांवर आज सखोल चर्चा होत आहे. या कार्यक्रमामुळे डिजिटल परिवर्तनाला गती मिळेल व उद्योगांच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एनटीटी डेटाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत दुबे यांनी फायरसाईड चॅट मध्ये मुलाखत घेतली.या मुलाखतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स,आयटी इनोव्हेशन व शाश्वत विकास या विषयांवर सखोल संवाद साधण्यात आला.दावोस येथील उल्लेखनीय गुंतवणूक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील क्रांती, महाराष्ट्रातील गो ग्रीन उपक्रमांवरही चर्चा झाली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य आणि फिटनेसचा मंत्र तसेच बॉलिवूडमध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमावर भाष्य केले.
यावेळी एनटीटी डेटाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अकिरा शिमाडा, जपानचे मुंबईतील कॉन्सुल जनरल यागी कोजी सान, वेन कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉनी लिम, जेआयसीटी (जपान आयसीटी फंड) चे कार्यकारी उपाध्यक्ष व संचालक ओहिमिची हिडेकी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.