भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद पुरेसा उपलब्ध – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रेसाठी आठ लक्ष बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –माघी,चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार मुख्य यात्रा पंढरपूर येथे साजरा करण्यात येतात.यापैकी सध्या कार्तिकी यात्रा सुरू असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने 8 लक्ष बुंदी लाडू प्रसाद व 50 हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे.70 ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकीट 20 रुपये प्रमाणे व 25 ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकीट 10 रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पश्चिमद्वार, उत्तरद्वार,श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून, सर्व स्टॉल 24 तास खुले ठेवण्यात येत आहेत.

बुंदी लाडू प्रसाद एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर,शेंगदाणा डबल रिफाइंड तेल,काजू, बेदाणा, विलायची इत्यादी पदार्थांपासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत आहे.या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोग शाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे. बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत यांना देण्यात आली आहे याशिवाय सुमारे 90 कर्मचारी 24 तास परिश्रम घेत असल्याचे मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top