सोलापूर :- तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अनिल हावळे यांस दिलेली एक वर्षाचा कारावास आणि रक्कम रु.५,०००/- च्या दंडाची दिलेली शिक्षा मे. सोलापूर सत्र न्यायालयाने निलंबित करून हावळे यांची जामिनावर मुक्तता केली.
याची हकीकत अशी की, तरूणीस हावळे यांनी त्यांच्या घरात प्रसाद देणे व घेणेवरून बोलावून तिचा विनयभंग केला, अशी फिर्याद तरूणीने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात देऊन तसा जबाब न्यायालयात दोनवेळा दिला. सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. हावळे यांनी गुन्हा केल्याचे शाबित झाल्याचे नमूद करून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांनी त्यास शिक्षा दिली.
त्या शिक्षेविरुध्द हावळे यांनी अॅड.आल्हाद अंदोरे व ना. उच्च न्यायालयाचे अॅड.अथर्व अंदोरे यांचेमार्फत मे. सत्र न्यायालयात अपिल दाखल केले.
अनिल हावळे हे सोलापूर शहरातील चांगला नावलौकिक असणारे व्यक्तिमत्व असून, त्यास दिलेली शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्याचे अवलोकनही कायदेशीर पध्दतीने केले गेले नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकिल अॅड.आल्हाद अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून तदर्थ सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी आरोपी हावळे यांची शिक्षा निलंबित करून त्यांची जामिनावर मुक्तता केली.
सोलापूर शहरात गाजलेल्या या खटल्यात आरोपीतर्फे अॅड. आल्हाद अंदोरे,अॅड. अथर्व अंदोरे व अॅड. सुयश पुळूजकर हे काम पाहत असून सरकारतर्फे अॅड.अल्पना कुलकर्णी हे काम पाहत आहेत.

