पंढरपूर शहरात प्रतिबंधित पानमसाला तंबाखू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई
₹६६,६२४ किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखुजन्य मुद्देमाल जप्त; एकाविरोधात गुन्हा दाखल
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ डिसेंबर २०२५ :पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित पानमसाला, गुटखा व सुगंधित तंबाखूची साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.या कारवाईत ₹६६,६२४/- किमतीचा प्रतिबंधित तंबाखुजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, महाद्वार रोड, पंढरपूर येथील यशवंत जुमाळे उर्फ गवळी हा त्याच्या राहत्या घरात आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित पानमसाला, गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्री करत आहे. या खात्रीशीर माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधिताच्या घराच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकला.
छाप्यात यशवंत दत्तात्रय जुमाळे उर्फ गवळी (वय ३४, रा. घर नं. २५७४, महाद्वार रोड, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्या ताब्यातून प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.सदर मुद्देमाल पोलीस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त चन्नवीर राजशेखर स्वामी यांनी याबाबत कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.),अपर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग प्रशांत डगळे (भा.पो.से.) तसेच पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सपोफौ. कल्याण ढवणे,पोलीस नाईक सचिन इंगळे,पोहवा विठ्ठल विभुते,पो.कॉ. शहाजी मंडले,कपिल माने व दिपक नवले यांनी केली.
