सी.एम. कृषी पर्यटन ॲग्रो रिसॉर्टवर पोलिसांचा धडक छापा; तब्बल ४० लाखांचा तंबाखूजन्य माल जप्त

सी.एम. कृषी पर्यटन ॲग्रो रिसॉर्टवर पोलिसांचा धडक छापा; तब्बल ४० लाखांचा तंबाखूजन्य माल जप्त

सांगोला भागात तंबाखू साठ्याचा पर्दाफाश; प्रशांत डगळे यांच्या पथकाची संयुक्त कारवाई

सांगोला | १० डिसेंबर २०२५ – सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगोला तालुक्यातील मौजे चिंचोली येथील सी.एम.कृषी पर्यटन ॲग्रो रिसॉर्ट येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठ्यावर कारवाई केली. या छाप्यामध्ये तब्बल ₹ ४०,३१,४१६ किमतीचा तंबाखूजन्य माल, पानमसाला व दोन वाहने असा एकूण मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पंढरपूर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना विशेष तपास पथकासह तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पंढरपूर उपविभागातील पोसई अब्दुलहमीद शेख यांच्या नेतृत्वाखालील पथक तसेच सांगोला पोलीस ठाण्याचे पथक संयुक्त कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले.

सी.एम.कृषी पर्यटन ॲग्रो रिसॉर्ट परिसरात पोहोचताच एक छोटा हत्ती (MH 45/AF 6406) आणि एक बोलेरो पिकअप (MH 45/AX 0539) संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालक व काही व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

तपासादरम्यान रिसॉर्टच्या हॉलमध्ये ₹१०,६४,२१२ किमतीचे सुगंधी तंबाखू, पानमसाला, एसपी-९९९, डायरेक्टर, मिराज, विमल इत्यादी पॅकेट्स आढळले.

छोटा हत्ती वाहनातून ₹९,५३,७६० किमतीचा RMD, विमल, गोल्ड कंपनीचा सुगंधी तंबाखू साठा मिळाला.बोलेरो पिकअपमधून ₹१०,६३,४४४ किमतीचा तंबाखू-पानमसाला माल जप्त करण्यात आला.

जप्त मालासह दोन्ही वाहने मिळून एकूण ₹४०,३१,४१६ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचनामा करून माल सांगोला पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही संयुक्त कारवाई सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पंढरपूर उपविभागाचे पोसई अब्दुलहमीद शेख,पोहेकॉ निलेश रोंगे,पोना विनोद शिंदे,पोकॉ शिवशंकर हुलजंती,पोकॉ राहुल लोंढे तसेच सांगोला पोलीस ठाणेचे पोसई श्री पुजारी व पोलीस अंमलदार यांनी ही कारवाई संयुक्तपणे पार पाडली.

Leave a Reply

Back To Top