अक्कलकोट(तालुका प्रतिनिधी) दि १९-अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील नागरिक दूषित पाण्याच्या गंभीर समस्येशी झुंज देत आहेत.सामान्य नागरिकांना निधान पिण्यासाठी शुध्द पाणी तरी देण्यात यावे.अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ता इस्माईल आळंद यांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पावसामुळे घरातील नळातून गटाराचे पाणी येत असून, पाण्याचा रंग काळसर आणि फेसयुक्त असतो. हे पाणी दोन ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमधून गळत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.दूषित पाण्यामुळे गंभीर आजार पसरण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. इस्माईल आळंद यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे संबंधित अधिकार्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पाण्याच्या पाईपलाईनमधील खड्डे तातडीने बुजवून नादुरुस्त नळ पाईप दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. जर या समस्येवर तातडीने तोडगा काढला नाही, तर ते स्वतः दूषित पाण्याचे भांडे घेऊन कार्यालयावर निदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मैंदर्गीतील नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे नगरपरिषदेने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे उचित वाटत आहे.
