सोलापूर- सोलापूरच्या पहिल्या
महिला खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी अचानक सिव्हिल रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. रुग्णालयातील अनागोंदी कारभार, रुग्णसेवेतील कमतरता आणि प्रशासकीय ढिसाळपणा पाहून खासदार शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रणिती शिंदे यांच्या भेटीदरम्यान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील अनेक गैरसोयींचा पाढा वाचला. रुग्णांना तपासणीसाठी स्वतःच्या नातेवाईकांना स्ट्रेचरवर घेऊन जावे लागते, कारण वॉर्ड बॉय उपलब्ध नसतात. केस पेपर काढण्यासाठी दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागते, तर बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांना उपचार न मिळता दोन-तीन दिवसांनी परत येण्यास सांगितले जाते. यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे खासदार शिंदे यांच्या निदर्शनास आले.
सिटीस्कॅन सुविधेतील त्रुटी
खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून सिविल रुग्णालयाला ८ मार्च २०२५ रोजी कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन उपलब्ध झाली. मात्र, या सुविधेचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नसल्याचे त्यांनी शनिवारी रुग्णालयातील सिटीस्कॅन विभागाला भेट दिल्यावर लक्षात आले. यावेळी रुग्णांनी सांगितले की, सिटीस्कॅनसाठी शुल्क आकारले जाते, परंतु त्याची फिल्म दिली जात नाही; केवळ मोबाइलवर फोटो स्वरूपात पाठवली जाते. तसेच, सिटीस्कॅन युनिटमध्ये केवळ एकाच कर्मचाऱ्याची नियुक्ती आहे, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतः रुग्णांना सिटीस्कॅन रूमपर्यंत न्यावे लागते. एमआरआय, सिटीस्कॅन आणि एक्स-रे यांचे रिपोर्ट वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या.
रुग्णांनी खासदार शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारींनुसार, येथील रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून औषधे दिली जात नाहीत. त्याऐवजी रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगितले जाते. एक्स-रे आणि सोनोग्राफी यांसारख्या सुविधांसाठी रोख रक्कम आकारली जाते, जी ऑनलाइन स्वीकारली जात नाही. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची वरिष्ठ डॉक्टरांकडून तपासणी केली जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्णांनी केला. याशिवाय, रुग्णालयातील काही डॉक्टर रुग्णालयाच्या वेळेत खासगी क्लिनिक चालवत असल्याचेही उघड झाले. अशा डॉक्टरांनी सिव्हिल रुग्णालयातील सेवा कालावधीत खाजगी प्रॅक्टिस करू नये असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सिव्हिल रुग्णालयाच्या आवारातील ए-ब्लॉकसमोरील बगीच्याच्या मोकळ्या जागेवर प्रशासनाने इमारत बांधण्याचे नियोजन केले आहे. या बगीच्याचा उपयोग रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक विश्रांतीसाठी करतात. या प्रस्तावित बांधकामाला रुग्ण, नातेवाईक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. खासदार शिंदे यांनी या मुद्द्याची गंभीर दखल घेत बांधकामाला तात्पुरती स्थगिती देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी रुग्ण आणि नातेवाईकांसाठी मोकळी जागा उपलब्ध राहावी, यासाठी प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.
खासदार शिंदे यांचा आक्रमक पवित्रा
खासदार प्रणिती शिंदे यांनी रुग्णालयातील या गंभीर त्रुटींकडे तातडीने लक्ष वेधत प्रशासनाला खडसावले. त्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे या सर्व तक्रारींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, रुग्णसेवा सुधारण्यासाठी आणि प्रशासकीय ढिसाळपणा थांबवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “रुग्णांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. सिव्हिल रुग्णालय हे सर्वसामान्यांसाठी आहे, आणि त्यांना दर्जेदार सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे,” असे शिंदे यांनी ठणकावले.
या भेटीने सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयातील विदारक वास्तव समोर आले आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, औषधांचा पुरवठा नियमित व्हावा, आणि प्रशासकीय सुधारणा व्हाव्यात, यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घालण्या बाबतच्या सूचना करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, रुग्णालयातील कर्मचारीवर्ग वाढवणे, सिटीस्कॅन आणि इतर सुविधांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे, आणि रोख शुल्क आकारणीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करणारा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार शिंदे यांनी सिव्हिल रुग्णालयातील सुधारणांसाठी एक व्यापक आराखडा तयार करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये रुग्णसेवेची गुणवत्ता वाढवणे, प्रशासकीय पारदर्शकता आणणे आणि रुग्णालयाच्या आवारातील मोकळ्या जागांचे संरक्षण करणे यांचा समावेश आहे. तसेच, रुग्णालयातील डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर निर्बंध घालण्यासाठीही त्यांनी पावले उचलण्याचे ठरवले आहे.
सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयातील या समस्यांकडे खासदार प्रणिती शिंदे यांनी वेधलेले लक्ष आणि त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा यामुळे रुग्णसेवेत सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे सोलापूरकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
