सोलापूर – न्यायदंडाधिकारी रागिणी जंगम यांनी चेक न वटल्या प्रकरणी वैशाली गोविंद सरवदे यांना सुनावलेल्या दोन महिन्यांच्या कारावासाची व साडेचार लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची शिक्षा अपीलात अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. योगेश राणे साहेबांनी निलंबीत केल्याचा आदेश जारी केला आहे.


यात हकीकत अशी की, फिर्यादी ललिता साबळे यांनी उसने दिलेल्या पैशाच्या देण्यापोटी वैशाली सरवदे यांनी दिलेला चेक न वटल्यामुळे सरवदे यांनी गुन्हा केल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. तथापि वैशाली सरवदेतर्फे ॲड. आल्हाद अंदोरे यांनी सोलापूर सत्र न्यायालयात अपील दाखल केले. चेकवर वैशाली सरवदे यांची सही नसून फिर्यादीने सरवदे यांचा कोरा चेक चोरुन तो चेक बेकायदेशीरपणे लिहून त्यावर सरवदे यांच्या खोट्या सह्या केल्याचा सरवदे यांचा बचाव कनिष्ठ न्यायालयाने कायदेशीरपणे विचारात न घेता भारतीय पुरावा कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसवुन दिलेला निकाल कायदेशीर नसल्याचा युक्तिवाद ॲड. अंदोरे यांनी सत्र न्यायालयासमोर केला. सत्र न्यायालयाने आदेश करुन कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल निलंबित केला आहे.
या खटल्यातील अपीलात वैशाली सरवदेंतर्फे ॲड. आल्हाद अंदोरे, ॲड. अथर्व अंदोरे, ॲड. सुयश पुळुजकर व ॲड. अमित कांबळे हे काम पाहात आहेत.