बठाण नदी पात्रातून बिगर पावतीचा वाळू घेवून जाणार्या टिपर चालकावर गुन्हा दाखल
15 लाख 25 हजाराचा पोलीसांनी केला मुद्देमाल जप्त…..
मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०/२०२५- बठाण येथील भिमा नदी पात्रातून वाळू भरुन जाणारा बिगर पावतीचा टिपर पोलीसांच्या मदतीने महसूल प्रशासनाने पकडून अज्ञात चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत अनेक बिगर पावती टिपरवर कारवाई झाल्याने संंबंधीत ठेकेदाराकडून पावती न देता केवळ पैसे घेवून वाहने वाळूने भरुन दिली जात असल्याचेच या कारवाईवरुन दिसत आहे.

पोलीस सुत्राने दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी तलाठी संग्राम वाडकर हे गुंजेगाव येथे कार्यरत असून दि.23 रोजी महसूल अधिकार्यांच्या आदेशाने हद्दीत चोरुन अवैध वाळूचे उत्खनन करुन चोरी करणार्यांवरती कारवाई करण्यासाठी तीन पथके नेमली होती. यामध्ये महसूल नायब तहसिलदार एम.एम.कन्हेरे,इतर ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश होता.दुपारी 4.30 वाजता निवडणूक नायब तहसिलदार जयश्री स्वामी यांनी फोन वरुन फिर्यादीस सांगितले की बठाण येथील वाळू डेपोच्या पॉईंटवर तुम्ही जावा व तेथे टिपर चेक करा.यानंतर फिर्यादी व अन्य महसूल कर्मचारी उचेठाण येथे थांबले असता सायंकाळी 6.30 वाजता एम.एच.13 डी.क्यू.0044 हा वाळू घेवून समोरुन येत असल्याने त्याला थांबण्याचा इशारा करुन पाठीमागील हौदात पाहिले असता वाळू होती.सदर वाहन उभा करुन चालक पळून गेला.विना परवाना वाळूचे उत्खनन करुन चोरुन विक्रीसाठी घेवून जात असल्याची खात्री झाल्याने सदर अज्ञात चालकाविरुध्द मंगळवेढा पोलीसात फिर्याद देण्यात आली असून पोलीसांनी वाळू व टिपर सह 15 लाख 25 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बठाण येथील नदी पात्रातून बिगर पावतीचा वाळू भरुन आलेला टिपर क्रमांक एम.एच. 13 डी.क्यू.0044 हा सामाजिक कार्यकर्ते शरद कोळी यांनी पकडून दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.सदर टिपरजवळ पावती नसल्यामुळे कोळी यांनी महसूल अधिकार्यांना फोन करुन सांगितल्यावर त्या टिपरवर कारवाई करण्यात आली आहे. महसूल अधिकार्यांनी दररोज वाहनांची तपासणी न केल्यास मी स्वत: रस्त्यावर उतरुन बिगर पावतीची वाहने तपासणार असल्याचे शरद कोळी यांनी सांगून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महसूल अधिकार्यांवर राहील असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.