महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यास बुध्दगयेत ठाण मांडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी 29 मार्च पासुन 3 दिवस बुध्दगयेत ठाण मांडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाड/मुंबई दि.21- महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रिपब्लिकन पक्ष देशभर होणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेला आहे. राज्यातही रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे महाबोधी महाविहारासाठी आंदोलन सुरु आहे.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आलेच पाहिजे.त्यासाठी बिहार मधील महाबोधी टेंपल ॲक्ट 1949 रद्द झाला पाहिजे.

महाबोधी महाविहाराचे 4 ट्रस्टी हिंदु आणि 4 ट्रस्टी बौध्द हा नियम रद्द करुन सर्व ट्रस्टी बौध्द असावेत असा कायदा केला पाहिजे या मागणीसाठी आपण येत्या 29 मार्च पासुन तीन दिवस बुध्दगयेत ठाण मांडणार असून बुध्दगयेत आंदोलन करणाऱ्या बौध्द धम्मगुरूंची आपण भेट घेणार आहोत.महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949  रद्द करुन बुध्दगयेतील महाबोधी महाविहाराचा ताबा बौध्दांना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना निर्देश देऊ शकतात तसा प्रयत्न आपण करणार आहोत.त्याचबरोबर मी स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि बिहारचे राज्यपाल मो.आरिफ खान यांची आपण भेट घेणार आहोत. महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात यावे यासाठीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने व पुर्ण ताकदीने उतरावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापन दिनी रायगड जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणाऱ्या जाहिर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे,मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, सुर्यकांत वाघमारे, युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे, परशुराम वाडेकर,विवेक पवार,घनश्याम चिरणकर, आदेश मर्चंडे,अमित तांबे,सुशांत सकपाळ, लोकप्रिय गायक आनंद शिदे,मिलिंद शिंदे, राहुल शिंदे,शाहीर राजा कांबळे, राहुल डालिंबकर,मोहन खांबे,लक्ष्मण जाधव, सुनिल बंसी मोरे, श्रीकांत कदम आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रासोबत बिहार आणि संपूर्ण देशभर आंदोलन सुरु ठेवणार आहे.महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात रिपब्लिकन पक्ष ताकदीने उतरला असुन सर्व आंबेडकरी जनतेने एकजुटीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला बळ द्यावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. सभेपूर्वी ना.रामदास आठवले यांनी महाड येथील क्रांतीस्तंभाला अभिवादन केले. यावेळी हजारे आंबडेकरी अनुयायी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top