महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात मोर्चा
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०३/२०२५ – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय. या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. टेम्पल ॲक्ट रद्द करून ते बौद्धांच्याच ताब्यात असावे, यासाठी विविध बौद्ध संघटनां कडून आंदोलन केले जात आहे. अनेक बौद्ध विहारांमध्येही आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले आहेत. शुक्रवारी महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समिती पंढरपूर यांच्यावतीने तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारने बिहार व केंद्र सरकारला कळवावे आणि बुद्धगया महाबोधी महाविहार हिंदू पंडितांच्या तावडीतून मुक्त करून बौद्धांच्या हातात द्या, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांना देण्यात आले.

यावेळी दीपक चंदनशिवे,आप्पासाहेब जाधव,सुनील वाघमारे, बाळासाहेब कसबे, सुजित सर्वगोड,दिलीप देवकुळे,एल.एस सोनकांबळे, अंबादास वायदंडे, संतोष पवार, उमेश वाघमारे, संतोष सर्वगोड,उमेश सर्वगोड,अमित कसबे,विष्णू धाईंजे, समाधान लोखंडे, पोपट क्षीरसागर यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. बौद्ध अनुयायी भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मंत्र जपणारे बांधव येथे येतात.मात्र या महाविहाराचे नियंत्रण व व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही.१९४९ चा टेम्पल कायदा रद्द करून विहाराचे व्यवस्थापन व नियंत्रण बौद्धांना सोपवण्यात यावे,याकरिता १९९३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद सरकारतर्फे वाटाघाटी सुरू होत्या. सरकारच्या विनंतीवरून ही याचिका मागे घेण्यात आली. तरीही केंद्र सरकार आणि बिहार राज्य सरकारने कुठलीही कारवाई केली नाही.म्हणून पुन्हा याचिका दाखल केली.१९९२ पासून आतापर्यंत आंदोलन सुरू असून सध्या विविध सामाजिक संघटना यासाठी आक्रमक झाल्या आहेत.