मंगळवेढा येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ केंद्रात 20 लाख 6 हजार 680 रूपयाचा अपहार

मंगळवेढा येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ केंद्रात 20 लाख 6 हजार 680 रूपयाचा अपहार

याप्रकरणी कनिष्ठ साठा अधिक्षकावर गुन्हा दाखल

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा येथे असलेल्या वखार महामंडळ केंद्रातील शासकीय गोदाम क्रमांक 2 मध्ये शेतकरी व व्यापारी यांनी भाडे तत्वावर ठेवलेल्या 1680 पोती सरकी पेंड व 4 खत पिशव्या असा एकूण 20 लाख 6 हजार 680 रूपये किंमतीच्या मालाचा अप्रामाणिकपणे स्वतःच्या फायद्याकरीता अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन लोकसेवक तथा कनिष्ठा साठा अधिक्षक महेश शिवशरण सलगरे वय 45 रा.पंढरपूर यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मंगळवेढा येथे असलेल्या वखार महामंडळातील केंद्रावर आरोपी हे कनिष्ठ साठा अधिक्षक म्हणून दि.15/12/2020 पासून कार्यरत होते. तर सचिन रामकृष्ण शिरसट यांची प्रशासकीय बदली झाल्याने सेवा ज्येष्ठतेप्रमाणे व वरिष्ठांच्या आदेशाने वखार केंद्राचा चार्ज घेण्यासाठी दिनांक 20/8/2024 रोजी ते हजर झाले होते. सचिन शिरसट हजर झाल्यापासून मंगळवेढा वखार केंद्राचे पुर्वनियुक्त कनिष्ठ साठा अधिक्षक तथा आरोपी महेश सलगरे हे वखार केंद्राचा चार्ज देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे सचिन शिरसट यांनी फिर्यादी विजय दारकुंडे उपमहाव्यवस्थापक विभागीय कार्यालय,पुणे यांना सांगितल्यावर त्यांनी वखार केंद्राचे दप्तर तपासणी करण्याच्या सुचना दिल्या. दप्तर तपासले असता दप्तरी नोंदी मध्ये व वखार केंद्रातील प्रत्यक्ष मालाचे साठयामध्ये तफावत आढळून आली.त्यामुळे सचिन शिरसट यांनी वखार केंद्राचा चार्ज घेण्यास नकार दिला. तेंव्हापासून आरोपी महेश सलगरे हे कर्तव्यावर गैरहजर होते.दिनांक 15/10/2024 रोजी सचिन शिरसट यांनी चार्ज घेतला व त्यांनी जा.क्र.मरावमं/मंगळवेढा/238/2024, दिनांक 21/10/2024 अन्वये केंद्रातील दप्तरी नोंदी व प्रत्यक्ष साठ्यामध्ये असलेली तफावत लेखी पत्राद्वारे फिर्यादीस कळवल्यानंतर या घटनेबाबत महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना ही घटना कळवली. तद्नंतर दिनांक 23/10/2024 रोजी लातूर विभागीय व्यवस्थापक निलेश लांडे यांनी मंगळवेढा वखार केंद्राचे इन्सपेक्शन केले. तपासणी दरम्यान त्यांना गोदाम क्रमांक दोन मधील पाच वखार पावत्यावरील एकूण 1680 पोती सरकी पेंड त्याची किंमत 20 लाख 6 हजार 680 व डेड स्टॉक मधील एक किलो वजनाच्या 4 खत पिशव्या त्याची किंमत 680 रूपये असा मुद्देमाल व वखार भाडे 1 लाख 71 हजार 805 रूपये नोंदी प्रमाणे कमी आढळून आल्याने तसा लेखी अहवाल महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना सादर केला असल्याचे पुणे विभागीय कार्यालयातील उपमहाव्यवस्थापक विजय कारभारी दारकुंडे वय 49 रा.कात्रज पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास मंगळवेढा पोलिस करीत आहेत.या अपहारामुळे शेतकरी व व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top