स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्तता करा
परभणी/जिमाका,दि.17 : शासकिय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे. अशा अर्जातील त्रुटींची पूर्तता 31 डिसेंबरपर्यंत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यास क्रमामध्ये विविध स्तरा वरील महाविद्यालयांत-शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामधील मुला-मुली प्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2024 पासून योजनेचे अर्ज ऑनलाईन भरावयाचे आहेत.त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेअंतर्गत सन २०२२-२३,२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननी अंती विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे तसेच अर्जातील माहितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत निघालेले आहेत.
या यादीतील अपात्र त्रुटीचे अर्जातील आक्षेप, त्रुटीची पूर्तता करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्तता करावी. विहीत मुदतीत या कार्यालयास आक्षेप नोंदविण्यात यावा. विहीत मुदतीत आक्षेप अथवा त्रुटी पूर्तता न केल्यास अर्ज अंतिम अपात्र करण्यात येईल.त्यामुळे जास्तीत- जास्त विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.