पाच लाख लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधिशासह तिघांवर गुन्हा दाखल
सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्याचा प्रयत्न करण्यात आला.या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम, आनंद खरात रा. खरातवस्ती,दहिवडी,ता. माण,किशोर खरात रा.वरळी आणि अन्य एक असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून त्यानुसार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (LCB) ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणीच्या वडिलांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल असून त्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.तिच्या वडिलांनी केलेला जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याकडे प्रलंबित आहे.तो मंजूर करण्यासाठी खासगी व्यक्ती किशोर खरात व आनंद खरात यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्याप्रमाणे व त्यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार पुणे एलसीबीकडे आली होती.
त्या अनुषंगाने ३ व ९ डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता न्यायाधीश निकम यांनी किशोर व आनंद खरात यांच्याशी संगनमत करून तक्रारदार यांच्या वडिलांचा प्रलंबित जामीन अर्ज मंजूर करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी दोघांच्या मार्फत पाच लाखांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवली.
तसेच ती रक्कम दोघांच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.पोलीस उपाधीक्षक अनिल कटके पुढील तपास करत आहेत.