शाखा बारामती येथील प्रकार…अपहार, चोरीबाबत बँकेकडे विमा पॉलिसी कार्यरत
पंढरपूर अर्बन बँकेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम नाही-सतीश मुळे
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर अर्बन बँकेच्या बारामती शाखेमधील व्यवस्थापकाने केलेल्या नऊ कोटी अपहाराचा कोणताही परिणाम बँकेच्या व्यवहारावर होणार नसून खातेदारांची सर्व रक्कम सुरक्षित आहे. याबाबत बँकेची सर्व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी दिली.

पंढरपूर बँकेच्या बारामती शाखेचा व्यवस्थापक अमित प्रदीप देशपांडे याने आपल्या पदाचा गैरवापर करत नऊ कोटी तीन लाख रुपयाचा अंतर्गत बँकिंग फसवणूकीचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे.याप्रकरणी बँकेने बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून देशपांडे याने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.बँकेच्या अंतर्गत तपासणीमध्ये एक महिन्यापूर्वी सदर आर्थिक अपहार केल्याची माहिती समोर आली. यानंतर तातडीने बँकेच्या अधिकाऱ्यांनी देशपांडे याची व त्याच्या कुटुंबातील सदस्यांची सर्व खाती गोठवली आहेत.हा प्रकार फक्त बारामती शाखेपुरता मर्यादित असून कोणत्याही ग्राहकांच्या खात्याशी संबधित नाही.यामुळे बँकेच्या कोणत्याही खातेदाराचे नुकसान झालेले नाही.
शाखास्तरावर बनावट नावाची खाते काढून व्यवस्थापक देशपांडे याने हा प्रकार केला आहे. यामध्ये कोणत्याही ग्राहकांचे नुकसान झाले नसल्याचे मागील १५-२० दिवसांच्या तपासणी दरम्यान निश्चित झाले आहे.बँकेची अशा बाबीसाठी स्वतंत्र विमा पॉलिसी कार्यरत आहे. यामुळे बँकेच्या व्यवहारावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे बँकेच्या व्हाईस चेअरमन माधुरी जोशी यांनी सांगितले.
राज्यात पंढरपूर अर्बन बँकेच्या 30 शाखा असून 2500 कोटीहून अधिक व्यवसाय आहे. झालेल्या अपहारामुळे सभासदांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसून बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याचे बँकेचे सीईओ उमेश विरधे यांनी सांगितले आहे .
