बार्शी:- बार्शी समस्त ख्रिश्चन समाज व बार्शी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश प्रेमचंद नवगिरे यांनी बार्शी शहर पोलीस निरीक्षक व तहसीलदार साहेब बार्शी यांच्याकडे निवेदन सादर करून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ख्रिश्चन समाजाविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य आणि धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, सांगली येथील स्व. ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात CBI चौकशी आणि पडळकर यांची आमदारकी रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
6 जून 2025 रोजी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथील ऋतुजा राजगे यांनी आत्महत्या केली. या प्रकरणात CBI चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी नवगिरे यांनी केली आहे. यासोबतच, आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथील एका सभेत ख्रिश्चन धर्मगुरूंना “धर्म परिवर्तन करणारे” ठरवत “जो धर्मगुरू तुमच्या गावात येईल, त्याला ठोकून काढा, त्याला ठोकल त्यांना एक नंबरला 5 लाख, दोन नंबरला ठोकणाऱ्याला 4 लाख, व जे त्या धर्मगुरूंचा सैराट (जीवे मारतील) त्यांना 11 लाखाचे बक्षीस जाहीर केल्याचा आरोप आहे. या वक्तव्याने ख्रिश्चन समाजात अस्वस्थता पसरली असून, धर्मगुरूंना धोका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मागण्या कोणत्या?
- स्व. ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येची CBI चौकशी करून दोषींवर कारवाई.
- गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी.
- पडळकर यांच्यावर भा.दं.सं. कलम 153(अ), 153(व), 295(अ), 505 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
- ख्रिश्चन धर्मगुरूंना आणि चर्चांना सुरक्षा पुरवावी.
समाजातील अस्वस्थता
निवेदनात नमूद आहे की, संविधानिक पदावरील व्यक्तीकडून अशी वक्तव्ये समाजात जातीय तेढ निर्माण करतात. ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची भीती आहे. या वक्तव्यामुळे ख्रिश्चन धर्मगुरू आणि ख्रिस्ती बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कायदेशीर कारवाईची गरज
राकेश नवगिरे यांनी पडळकर यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी कोणतीही हानी झाल्यास पडळकर जबाबदार असतील, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
निवेदनाची प्रत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आणि बार्शी शहर पोलीस स्टेशन यांना पाठवण्यात आली आहे. ख्रिश्चन समाजाने तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासन या प्रकरणात काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी ख्रिश्चन धर्मगुरू पा.प्रकाश दाखले, पा.विश्वास साळवी, पा.स्टीवन चांदेकर, पा.बारनबस भादेकर, शांतवन रणदिवे, सूर्यकांत लोखंडे, अजय नवगिरे, सुरेश शिंदे, ख्रिश्चन तरुण संघ, ख्रिश्चन महिला संघ, युवक काँग्रेसचे राकेश नवगिरे, महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी सुवर्णताई शिवपुरे, विनोद नाना वाणी, कृष्णराज बारबोले, मोहसीन तांबोळी, सतीश पाचकडवे, बप्पा सुतार तसेच वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उभाटा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व इतर सामाजिक संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे आदी मान्यवर उपस्थित होते.