गुंजेगाव येथील दुहेरी खून प्रकरणी सर्व सात आरोपी अटकेत
न्यायालयाने पोलीस कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ….
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील गुंजेगाव येथील रिना आप्पासो ढोबळे वय 35 व चंद्रकांत तात्यासो पाटील वय 45,रा.राजापूर या दुहेरी खून प्रकरणातील एकूण आत्तापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून मंगळवेढा न्यायालयाने यांना चार दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची माहिती अशी की,मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथे दि.11 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनीटांनी वरील दोघांचा आरोपी लक्ष्मण ढोबळे,सतिश कारंडे,प्रदिप कारंडे, गणेश ढोबळे,निशांत ढोबळे,ज्ञानेश्वर खोळपे,कैलास कारंडे आदींनी दोघांच्या डोक्यात कोयता,काठी,लोखंडी पाईप याने मारुन खून केला होता. सदर घटना घडताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुंजेगाव येथील घटनास्थळी भेट देवून फरार आरोपींना तात्काळ पकडण्याच्या सुचना केल्याने तपासिक अंमलदार,मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी तपासाची चक्रे फिरवुन सर्व सात आरोपींना अटक केली आहे. तपासा दरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले लोखंडी पाईप,काठ्या कोयता आदी साहित्य जप्त केले आहे.
मयत रिना व चंद्रकांत या दोघात प्रेमसंबंध होते. तसेच मयत रिना हिच्या पतीचे चार ते पाच वर्षापुर्वी निधन झाल्याने तिच्या नावावर असलेली दोन एकर जमीन विकल्याने या रागापोटी आरोपींनी दोघांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. एकाच वेळी दोघांचा खून झाल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली होती आणि भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला न्यायालयाने दि.18 मार्च पर्यंत म्हणजेच सात दिवसाची पोलीस कोठडी दिली होती.त्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा आरोपींना न्यायालयात उभे केले असता चार दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती.