प्रक्षाळपूजेने होणार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे राजोपचार पूर्ववत
दि.20 नोव्हेंबरला श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,ता.19-श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची दि. 20 नोव्हेंबरला प्रक्षाळ पूजा संपन्न होत असून, श्रींचे सुरू असणारे 24 तास दर्शन बंद होऊन सर्व नित्यराजोपचार सुरू होत असल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

कार्तिकी एकादशी मंगळवार,दि.12 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.
त्यानुसार दि.04 नोव्हेंबर रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढून श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणीमातेस तक्या देण्यात आला होता. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दि. 20 नोव्हेंबरला प्रक्षाळपूजा होत असून, त्या दिवशी पहाटे 4 ते 5 या वेळेत नित्यपुजा, दु.12.20 ला पहिले स्नान, दु.2.10 ते 5.30 या वेळेत महाअभिषेक, पोषाख, अलंकार व महानैवेद्य तसेच सायं.6.45 वाजता धुपारती व रात्री 12 नंतर शेजारती होणार आहे. या दिवशी श्रींचा पलंग शेजघरामध्ये ठेवण्यात येत असून, श्रींचे सुरू असणारे 24 तास दर्शन बंद होऊन, सर्व नित्यराजोपचार पूर्वीप्रमाणे सुरू होत आहेत.देवाचा थकवा/ शिणवटा घालविण्यासाठी आर्युवेदीक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारतीवेळी दाखविण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.