काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेस मोठा प्रतिसाद
द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना थारा देऊ नका
मुस्लिम,मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध – खा.प्रणिती शिंदे यांची ग्वाही

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/११/२०२४: जाती-धर्माच्या नावाखाली द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना कदापि थारा देऊ नका मुस्लिम व मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष काँग्रेसच्या सर्वांनी पाठीशी राहावे. काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे,असे आवाहन काँग्रेसच्या खा.प्रणिती शिंदे यांनी येथे केले.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ आज भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेस महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याप्रसंगी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी माजी महापौर आरिफ शेख,माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी,तोफीक हत्तुरे, विनोद भोसले,शकील मोलवी,रुस्तुम कम्पली,असिफ तिमापुरे ,मैनोदिन शेख, नजीब शेख आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

बेगम पेठ मटण मार्केट येथून वाजत गाजत या पदयात्रेस सुरुवात झाली. त्यानंतर पुढेही पदयात्रा प्रभाग 14 मधील विविध भागातून काढण्यात आली. विजापूर बेस, बाराइमाम चौक , पेंटर चौक , किडवाई चौक, यशोधरा हॉस्पिटल मार्गे बेगम पेठ मटण मार्केट येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
गळ्यात काँग्रेसचे शेले घालून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रणिती ताई तूम आगे बढो – हम तुम्हारे साथ है , चेतन भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. काँग्रेसचे नरोटे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा विश्वास यावेळी महिला व मतदारांनी दिला.
या पदयात्रेचा समारोप सभेने झाला. या सभेत खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या कारभारावर तोफ डागली.

धर्मनिरपेक्ष काँग्रेसला खंबीर साथ द्या : खा.प्रणिती शिंदे
सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी काँग्रेसने सदैव कार्य केले आहे तर दुसरीकडे जाती धर्माच्या नावाखाली काही पक्ष द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.भडकाऊ भाषणे देऊन संवेदनशील वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न यापूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान करण्यात आला. मात्र लोकांनी संयम राखत अशा द्वेष निर्माण करणाऱ्या लोकांच्या भूलथापांना बळी पडले नाहीत.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला.यंदाही विधानसभेच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष काँग्रेसला साथ द्या. काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले.
