तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दिलेले वचन पाळणार !भाजप सरकारने केवळ आदानी, अंबानींनाच मोठे केले –तेलंगणाचे मंत्री कोमाटीरेड्डी वेंकट रेड्डी यांचा घणाघाती आरोप
महाराष्ट्रातही पंचसूत्रीची अंमलबजावणी करणार : खा. प्रणिती शिंदे
कॉर्नर सभेत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना विजयी करण्याचा संकल्प

सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : तेलंगणा राज्यात निवडणुकीत दिलेले सहा गॅरेंटीचे वचन काँग्रेसने पूर्ण केले आहे. तेलंगणा प्रमाणेच आता महाराष्ट्रातही वचनपूर्ती करण्यात येईल असे आश्वासन देतानाच भाजप सरकारने केवळ आदानी, अंबानींनाच मोठे केले, असा आरोप तेलंगणाचे मंत्री कोमाटीरेड्डी वेंकट रेड्डी यांनी सोलापुरात केला.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते.यावेळी विचारमंचावर काँग्रेसच्या खा.प्रणिती शिंदे, उमेदवार चेतन नरोटे, मुंबई प्रदेश जनरल सेक्रेटरी आसिफ फारुकी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

तेलंगणाचे मंत्री कोमाटीरेड्डी वेंकट रेड्डी यांनी आपल्या भाषणात तेलंगणा राज्यात काँग्रेस सरकार येताच दिलेल्या सहा गॅरंटीची पूर्तता केली. दिलेला शब्द येथे काँग्रेसने पाळला. काँग्रेसचे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना गॅस सिलेंडरचा दर 400 रुपये होता. आता तो कित्येक पटीने वाढला आहे. भाजप सरकारने केवळ अदानी, अंबानींनाच मोठे केले मात्र काँग्रेसचा विविध योजनांमुळे तेलंगणातील जनतेला सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेलंगणा प्रमाणेच महाराष्ट्रातही काँग्रेस आपली वचनपूर्ती करण्यास कटिबद्ध आहे. सोलापुरात खा. प्रणिती शिंदे यांची आपणा सर्वांना खंबीर साथ लाभणार आहे. त्यामुळे शहर मध्यचे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन मंत्री कोमाटीरेड्डी वेंकट रेड्डी यांनी केले.
याप्रसंगी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

महाराष्ट्रातही पंचसूत्रीची अंमलबजावणी करणार : खा.प्रणिती शिंदे
काँग्रेस महाविकास आघाडी सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे देण्यात येतील. महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळणार आणि मोफत बस प्रवास करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येईल. बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपयांची मदत करण्यात येईल.जातीनिहाय जनगणना करणार आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही आश्वासन खा.प्रणिती शिंदे यांनी दिले.