रिक्षा संघटनांचा काँग्रेसचे चेतन नरोटे यांना पाठिंबा -गिरणी कामगाराच्या मुलाला विधानसभेत पाठविण्याचा निर्धार रिक्षावाल्यांनी केला
भाजपने लावलेली जाती धर्माच्या भेदाची कीड मुळासकट उपटून काढा :खा.प्रणिती शिंदे
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/११/२०२४: सोलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला.काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना खासदार केले आता चेतन नरोटे यांच्या रूपात गिरणी कामगाराच्या मुलाला विधानसभेत पाठविण्याचा निर्धार यावेळी रिक्षा चालकांनी केला.

शहरातील एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन व इतर परिसरातील रिक्षा संघटनांनी आज काँग्रेसचे शहर मध्य विधानसभा मतदार संघातील उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला. होम मैदान जवळ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मा.नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, रिक्षा चालक संघटनेचे अशोक गायकवाड, आतिश शिंदे, पुरुषोत्तम गवळी, शिवाजी साळुंखे, चंदू गायकवाड, रियाज बागवान, रमेश जाधव, लक्ष्मण गायकवाड, बसू कोळी, राहुल जानकर आदींसह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना पाठिंबा दिला आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला. काँग्रेसचे चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी खा.प्रणिती शिंदे म्हणाल्या, काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे हे गेल्या अनेक वर्षां पासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत.ते गिरणी कामगारांचा मुलगा आहेत.त्यांनी कष्ट करून पाच वेळा नगरसेवक पद भूषविले. सर्वांच्या सुखदुःखात ते सहभागी असतात. त्यांचा संघर्षाचा प्रवास आहे रिक्षा संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे ही समाधानाची बाब आहे. काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना मतदान करण्यासाठी सर्व प्रवाशांना व लोकांना आवर्जून सांगा असे आवाहन खा शिंदे यांनी केले.
समाजाला एक ठेवणे ही काँग्रेसची संस्कृती आहे.गोरगरिबां साठी काँग्रेस काम करते. शांती नांदावी हाच काँग्रेसचा नेहमी प्रयत्न असतो.गेल्या पंधरा वर्षात त्यामुळे येथे दंगल घडवण्याची कुणाची हिंमत झाली नाही. त्यामुळे माझ्यानंतर आता काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून द्या.सर्व जाती-धर्माचे लोक काँग्रेसला मानतात, हेच काँग्रेसचे यश आहे. भाजपाने लावलेली जाती धर्माच्या भेदाची किड मुळासकट उपटून काढा,असे आवाहन यावेळी खा.प्रणिती शिंदे यांनी केले.

23 तारखेला इतिहास घडवा : चेतन नरोटे
सोलापूर शहर मध्य मतदार संघात एम आय एम चा उमेदवार आहे. ते मुंबईचे आहेत तर पक्ष हैदराबादचा आहे. भाजपचे उमेदवार हिंदुत्वाचे आता गाणे गात आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते.तिथे रमले नाहीत म्हणून शिवसेनेत गेले.त्यानंतर भाजपात गेले.त्यांना लोकांशी काही देणे घेणे नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेही जातात असा आरोप करत लोकसभेत प्रणिती ताईंना खासदार केले आता या गिरणी कामगाराला विधान सभेत पाठवा आणि येत्या 23 तारखेला नवा इतिहास घडवा, असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांनी केले.
