रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

माहीम मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर आणि मानखुर्द शिवाजीनगर मध्ये सुरेश पाटील यांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत पाठींबा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा

रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठीच महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6 – रिपब्लिकन पक्ष हा महायुती चा प्रमुख घटका पक्ष आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा आहे.माहीम मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर यांना आमचा पाठिंबा आहे.तसेच मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे अशी घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.गरवारे क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना.रामदास आठवले बोलत होते.

रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठीच आपण रिपब्लिकन पक्षाचा महायुतीला पाठिंबा दिला आहे.मागील अडीच वर्षात रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला नाही मात्र आता महिन्याभरात निवडणूक कार्यक्रम संपेल आणि पुन्हा महायुती सरकार सत्तेवर येईल.त्यात रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा निश्चित मिळेल.रिपब्लिकन पक्षाला विधान परिषद सदस्य,चार महामंडळाची अध्यक्षपदे; आणि 60 महामंडळ सदस्य पदे,जिल्हा तालुका शासकीय समित्यांची सदस्यपदे रिपब्लिकन कार्यकर्त्यांना देण्यात येतील. आगामी काळात महापालिका निवडणुका ; जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपले वॉर्ड बांधावेत.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांना निश्चित उमेदवारी मिळेल.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांतील उमेदवारी जिंकण्याची तयारी आतापासूनच रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी करावी त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागा वाटपमधील नाराजी दूर सारून महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून आपल्या उमेदवारांची माघार घेतली हा त्यांचा राजकीय सामाजिकदृष्ट्या अत्यंत चांगला आणि दूरदृष्टी असणारा निर्णय आहे.त्यांच्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो. केवळ एका समाजाच्या मतावर उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे माघार घेण्याचा त्यांचा निर्णय हा महायुतीचा विजय सुकर करणारा निर्णय आहे असे सांगत ना.रामदास आठवले यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीच्या मतांवर निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणून शेड्युल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून सर्व जाती जमाती धर्मियांना सोबत घेणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची संकल्पना मांडली.त्यामुळे मराठा समाजाची संख्या जास्त असली तरी एका समाजाच्या बळावर निवडणुका जिंकता येत नाहीत असे ना.रामदास आठवले म्हणाले.

राज ठाकरे यांनी माझ्या मंत्रीपदाबद्दल जे वक्तव्य केले ते त्यांना शोभणारे नाही.त्यांना मंत्री व्हायचे नसेल तर त्यांनी मंत्री होऊ नये. आम्हाला महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी सत्ता हाती घेण्याचा संदेश दिला आहे.मी तळागळातून आलेलो आहे त्यामुळे सत्ता महत्त्वाची आहे.गरिबांना मदत करणे आणि सत्तेचा गरिबांसाठी उपयोग करणे याची मला जाणीव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top