स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण आयोजित दसरा निरबावी संवर्धन व पूजन मोहीम – नीरा नदी उगमस्थान

स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण आयोजित दसरा निरबावी संवर्धन व पूजन मोहीम – नीरा नदी उगमस्थान

भोर/ज्ञानप्रवाह न्यूज – भोर महाड रस्त्यावर हिरडस मावळात सह्याद्रीच्या कुशीत भोरपासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर शिरगाव येथे असलेल्या नीरा नदीचे उगमस्थान तसे दुर्लक्षितच आहे. निरबावीची अशीही दंतकथा आहे की हे बांधकाम पांडवांनी एका रात्रीत केले आहे.बांधकाम पांडवकालीन आहे की नाही हे इथे असलेल्या दोन शिलालेखवरून जाणकारांच्या मदतीने लावले जाऊ शकते असा चौकोनी आकारात केलेल्या या दगडी बांधकामाला तीन चौथरे आहेत. मधल्या चौथऱ्यामध्ये तीन बाजूंना तीन खोबण्या आहेत. ज्यामध्ये पाषाण रूपातील या जंगलाचे राखणदार असणाऱ्या देवतां विराजमान आहेत. (नीरा नदीच्या उगमस्थान असलेले नारोबा आणि इतर देवता) डाव्या बाजूच्या एका खोबणीच्या खालून गोमुखातून हे नीरा माईचे पाणी पहिल्यांदा प्रवाहित होऊन बाहेर येते. सध्या हे गोमुख काही अंशी मातीमध्ये गाडून गेलेले आहे.

पुढे हीच नीरा नदी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून प्रवाहित होते.पांडवकालीन कुंडाच्या समोरच एक छोटे खाणी मंदिर वजा घराचे पडके अवशेष पहावयास मिळतात. त्याच्या मागे समाध्या आणि भग्नावस्थेतील नंदी असून त्याच्या थोडेसे पुढे छत नसलेल्या दगडी चौथऱ्यावर शिवलिंग, नंदी गणपती आणि इतर देवतांच्या थोड्याश्या जीर्ण मुर्त्या पहावयास मिळतात.नीरा नदीवर देवघर,वीर ही धरणे बांधलेली असून नीरा नदीची उपनदी असलेल्या वेळवंडी नदीवर येसाजी कंक जलाशय / भाटघर धरण बांधले आहे . वेळवंडी नदीबरोबरच गुंजवणी,कऱ्हा, बाणगंगा, खेमवती, पूर्णगंगा या उपनद्या नीरा नदीस येऊन मिळतात. पुढे नीरा नदी भीमा नदीला जाऊन मिळते.

ठरल्याप्रमाणे सकाळी नितीन कुडले, सुशांत झुणगारे, योगेश परखंदे असे तिघे आपटीला गाडी लावून आमचे इतर सहकारी मित्र शिव व्याख्याते संदिप खाटपे,लेखक दिपक नवघणे, प्रविण वरे असे मोहिमेच्या दिशेने निघालो.साधारण निगुडघरला असताना जेष्ठ मार्गदर्शक आण्णाकाका कुडले व आण्णा थोपटे हे देखिल मागून मोहिमेसाठी आले आहेत असे फोन वरून समजले.ते येईपर्यंत आम्ही वरंधा घाटातील वाघजाई मातेचे दर्शन घेऊन पुन्हा धारमंडप येथे पोचलो. सर्वांनी गाड्या लावून पायवाटेने झाडा झुडपातील पायवाटेने निरबावी पर्यंत पोचलो. सण असल्याने (दसरा) आम्ही आठच सदस्यांना आजचे काम करायला लागणार होते म्हणून प्रथमतः सर्व ठिकाणची पहाणी करून सुरुवात महादेवाच्या पिंडीपासून केली. नंतर शेजारी असलेल्या घर वजा मोकळ्या मंदिराच्या पडक्या अवशेषांचे साफ सफाई करून आत वाढलेली झाडे काढून कुंडाच्या आतील आणि बाहेरील बाजूची सफाई केली. तिथे उगवलेली झाडे- झुडपे काढून पूजन करून सोबत आणलेल्या झेंडूच्या माळा, फुल आपट्याची पान वाहून पूजा केली.इथे येऊन आम्हाला एक विलक्षण अनुभूती मिळाली. मानसिक समाधान आणि गडसंवर्धन, समाधी-वीरघळ संवर्धन करण्यासाठी असच अजून काहीसं नवीन करण्याची प्रेरणा मिळाली.इथून पाय निघत नव्हता परंतु निघण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता कारण आत्तापर्यंत पडलेले ऊन सरून वातावरण काळेकुट्ट होऊन पाऊस पडायला सुरुवात झाली होती. वरून आण्णा काकांचे सारखे बोलणं चालू होते की पोरांनो दसऱ्याचा दिवस आहे वेळेत घरी जायला हवं.पण आम्ही झाडीतून वाट काढत गाडी पर्यंत पोहचेपर्यंत पाऊस आणि चिखलाने आमच्यासोबत रंगपंचम खेळून झाले होते.
अशा तऱ्हेने आम्ही पुढे शिरगाव हद्दीतील दुरुकच्या जननीचे दर्शन घेऊन दुर्गाडी करून शिरवली येथील जननी देवी व कांगुरमल नाथाचे दर्शन घेऊन देवघर धरणाची प्रदक्षिणा पूर्ण करत घर गाठले.तोवर देवघर येथे आमची वाट पाहत असलेले स्वराज्यभूमी प्रतिष्ठाणचे आधारस्तंभ महेंद्र देवघरे आणि सचिन शिंदे हे आमची वाट पाहून मार्गस्थ झालेले होते.

नीरा नदीच्या उगमस्थानाचे संवर्धन करणे गरजेचे असून निरबावीच्या गोमुखाच्या येथे ओहोळ तयार करून पाण्यास प्रवाहित करणे, उघड्यावर असल्याने येथील देवतांच्या प्राचीन मुर्त्यांची झीज होत असल्याने छप्पर टाकणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top