नवोदित शिल्पकारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबादारी देण्याचा निर्णय चुकीचा:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मालवणमधील राजकोट किल्ल्याला भेट देऊन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी
मालवण /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.1 – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुःखद असून मनाला चटका लावणारी आहे.या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम नवोदित शिल्पकारास देण्याचा निर्णय चुकीचा होता.राज्यात राम सुतार आणि सारंग सारखे ज्येष्ठ अनुभवी शिल्पकार असताना नवोदितांना ही मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय चुकीचा होता असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
आज मालवण मधील राजकोट किल्ल्याला ना रामदास आठवले यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडलेल्या जागेची पाहणी केली.

मालवण राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अक्षम्य आहे.मोठे वादळ आलेले नसताना पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी झाली पाहिजे.नेव्ही आणि पीडबल्यूडी च्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. याप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.जो कोणी मुख्य दोषी असेल त्यास फाशीची कठोर शिक्षा झाली पाहिजे असा हा गुन्हा घडला आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले.
याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माफी मागितली आहे त्यामुळे विरोधकांनी यात राजकारण करू नये. या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा कसा मजबूत चांगला भव्य उभारता येईल यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य सरकार ने नव्याने पुतळा उभारण्यासाठी सरकारी पक्षासोबत विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना आणि तज्ञांचां समावेश करून समिती नियुक्त करावी अशी आपली मागणी असून आपण याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत असे ना रामदास आठवले म्हणाले.
कन्याकुमारी येथे तीन समुद्राचा संगम आहे तिथे अनेक पुतळे आहेत मात्र आजवर कधीही पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली नाही.मात्र राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली याचे दुःख आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.