पैठणमध्ये बचत गटांसाठी अस्मिता भवन उभारणार-डॉ.नीलम गोऱ्हे
लाडकी बहिण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पैठण /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ ऑगस्ट २४- मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगर मधून सुरवात झाली असून, आज पैठण मध्ये उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महिलांना माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पैठणमधील माहेश्वरी धर्माशाळेच्या सभागृहात आज दि. १ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात बोलताना जिल्हाप्रमुख पुष्पा गव्हाणे यांनी सांगितले की,पैठण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना लाडकी बहीण योजनेचे फाॅर्म वाटप करण्यात आले आहेत.हे फाॅर्म काटेकोरपणे भरून देण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली. तसेच आतापर्यंत तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे ५७ हजार फॉर्म भरून झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यातील गोरगरीब माता बहिणीं साठी लेक लाडकी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना या सारख्या अनेक योजना राबवत असताना लाडक्या बहिणीच्या सावत्र भाऊ फॉर्म भरून ते शासनाकडे जमा न करण्याचे कटकारस्थान करत आहेत,असा टोला प्रवक्त्या प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांनी विरोधकांना शिवसेना लगावला.
आनंदाचा शिधा आणि बस मध्ये अर्ध्या तिकीटात प्रवास या योजनांचा थेट लाभ हा माताभगीनींना होत आहे. दोन्ही योजना यशस्वी झालेल्या आहेत. आता मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान योजनेवर विरोधक टिका करत आहेत.१५०० रुपयात काय होणार ? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना महिलांची काटकसर व बचतीची सवय माहिती नाही असे यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी कार्यक्रमात सांगितले.

विरोधक म्हणतात दीड हजार रुपयात काय होणार पण त्याची जेव्हा यादी काढली तेव्हा कळते की १५०० रुपयांमध्ये जीवन उपयोगी अनेक वस्तू येतात.यामध्ये गहू- तांदूळ १०० ते १५० किलो येऊ शकतो,काही वेळेला महिलेचा चष्मा तुटलेला असतो पण पैशांअभावी ती महिला तोच चष्मा वापरत असते, पण या १५०० हजारात चष्मा व यासह अनेक वस्तू दीड हजारात मिळू शकतात असेही डॉ.निलम गोऱ्हे यांनी कार्यक्रमात स्पष्ट केले.
रक्षाबंधनाला पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री भावाकडून रक्कम जमा होणार आहे आणि नारी शक्तीच्या सन्मानावर शिक्कामोर्तब होणार आहे ,असे प्रतिपादन डॉ.गोऱ्हे यांनी या कार्यक्रमात केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, महिलांसाठी तालुका स्तरावर आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. येणाऱ्या काळात पैठण तालुक्यामध्ये बचत गटांसाठी ‘अस्मिता भवन’ उभारणार असून, अस्मिता भवन साठी आमदार निधीतून दहा लाख रुपये देणार असल्याचे डॉ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी कार्यक्रमात जाहीर केले.
या भवनात महिलांसाठी क्रीडा, मनोरंजन, वाचनालय व बचत गट बैठका यांची सुविधा निर्माण केल्या जातील.अशी माहिती डॉ.गोऱ्हे यांनी कार्यक्रमात दिली.

यावेळी ज्योतीताई वाघमारे (प्रचार व प्रसारक मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष), पुष्पाताई संदिपान भुमरे,वर्षाताई विलास भुमरे,प्रतिभाताई जगताप (संपर्कप्रमुख संभाजीनगर),शिल्पा राणी वाडकर (जिल्हाप्रमुख), पुष्पाताई गव्हाणे (जिल्हा प्रमुख), रंजनाताई कुलकर्णी (संपर्कप्रमुख लातूर),ज्योतीताई पठाडे (तालुकाप्रमुख पैठण) यांच्यासह पैठण मधील पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्योती काकडे यांनी केले.