सिंधुदुर्गच्या जंगलात साखळीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळली मूळची अमेरिकन महिला, काय आहे प्रकरण?


rape
सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील कराडीच्या डोंगरांच्या जंगलात मूळची अमेरिकन महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे.विशेष म्हणजे या महिलेला तिच्या नवऱ्यानेच बांधून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. महिलेनं स्वतःच एका कागदावर लिहून याबाबत सांगितले आहे.

 

ही महिला मूळची अमेरिकन आहे पण अनेक वर्षांपासून ती तामिळनाडूतच राहते. तसेच तिच्या आधारकार्डावर तामिळनाडूचा पत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

जंगलामध्ये काही दिवसांपासून अन्न-पाण्याशिवाय ही महिला बांधलेल्या अवस्थेत होती, असं तिनं लेखी सांगितलं आहे. सदर महिला या अवस्थेत नेमकी किती दिवस होती हे स्पष्ट झालेलं नाही.

 

पुढील तपास सुरू आहे, तो पूर्ण होईपर्यंत खात्रीशीर माहिती देता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी जंगलाच्या परिसरातून जाणाऱ्या शेतकरी आणि गुराख्यांना ओरडण्याचा आवाज आल्यामुळं त्यांनी जाऊन पाहिलं असता, त्यांना ही महिला बांधलेल्या अवस्थेत मिळाली.

 

त्यानंतर या महिलेला सोडवून तिच्यावर सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. अन्न-पाण्याविना राहिल्यामुळे या महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं दिसून येत आहे. मात्र तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.

 

गुराखी-शेतकऱ्यांना आला आवाज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी कराडीचे डोंगर आहेत. या डोंगरातील जंगलाच्या परिसरात शनिवारी सकाळी काही गुराखी आणि शेतकरी गुरं चरण्यासाठी गेले होते.

 

या परिसरात त्यांना महिलेच्या किंकाळ्या ऐकू आल्या. तो आवाज ऐकल्यानंतर त्या सर्वांनी त्या दिशेनं शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला.

 

त्यावेळी जंगलामध्ये आत काही अंतरावर एका झाड्याच्या बुंध्याला एका महिलेच्या पायाला साखळदंड बांधून ठेवल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

 

महिलेची अवस्था अत्यंत वाईट होती. अशाप्रकारे तिला पाहिल्यानं ते घाबरून गेले. त्यांनी लगेचच पोलिसांसह जवळपासचे गावकरी आणि पोलीस यांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर पोलीस याठिकाणी पोहोचले. त्यांना संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि महिलेच्या पायाची साखळी तोडून तिची सुटका केली आणि तातडीनं महिलेला उपचारासाठी नेले.

 

सुटका केली तेव्हा महिलेला काहीही नीट बोलता येत नसल्याचं समोर आलं. या महिलेला पोलिसांनी तिथून सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आज सकाळी तिला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

 

फोटो आणि व्हीडिओमध्ये पाहिलं असता, महिलेच्या शरीरावर कुठे फारशा जखमा दिसत नाहीत. मात्र, अनेक दिवसांपासून काहीही खाल्लेलं पिलेलं नसल्यानं त्या प्रचंड अशक्त झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत होतं.

 

पतीनेच बांधून ठेवले?

या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर काही प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर महिलेची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

पण महिलेला नीट बोलता येत नसल्यानं तिनं लिहायला कागद पेन मागितला आणि लिहून तिच्याबरोबर काय घडले याबाबत माहिती दिली.

 

तिनं पतीनंच तिच्याबरोबर अशाप्रकारचं कृत्य केलं असल्याचा लेखी दावा केला आहे. पण त्यानं तिच्यासोबत नेमकं असं का केलं? किंवा इतर काहीही माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही.

 

बोलता येत नसल्यामुळे लिहून सांगितले

पोलिसांनी महिला बोलण्याच्या स्थितीत नसल्याने, नक्की काय घडलं आहे हे सध्या तरी सांगता येत नाही, असं म्हटलं आहे. पण महिलेनं स्वतः एका कागदावर लिहून तिच्याबरोबर काय घडलं हे सांगितलं.

 

त्यानुसार, तिला कोणतं तरी इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यामुळं तिच्या जबड्याची हालचाल होत नव्हती. परिणामी तिला तोंडानं साधं पाणी पिणंही शक्य नव्हतं

या महिलेनं ती जंगलामध्ये अन्न पाण्याविना 40 दिवसांपासून अशा अवस्थेत होती असा दावा कागदावर लिहून केला आहे. मात्र एवढे दिवस अन्न पाण्याविना ती कशी राहिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

“माझ्या पतीनं मला झाडाला बांधून ठेवलं होतं. याच जंगलात तुझा अंत होईल. मी पीडित असून यातून बचावले. पण तो याठिकाणाहून पळून गेला,” असं महिलेनं लिहून सांगितलं.

 

ठोस माहितीनंतरच बोलणार-पोलीस

पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू असून सखोल चौकशीसाठी पथकं स्थापन केली असल्याचं सांगितलं आहे.

 

प्रथमदर्शनी महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं जाणवत आहे. पण त्याबद्दल काही नक्की बोलता येणार नाही, असं पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी म्हटलं.

 

या महिलेनं यापूर्वी दिल्ली, मुंबई, गोवा अशा ठिकाणी उपचाराच्या निमित्ताने डॉक्टरांच्या भेटी घेतल्या आहे. महिलेकडून मिळालेल्या कागदपत्रावरून ही माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसंच महिलेनं तिचा नवरा तामिळनाडूमध्ये नवरा असतो असं सांगितलं आहे. त्याच्यावर आरोपही केले आहेत. त्यासाठी पोलिसांनी तामिळनाडूलाही एक पथक पाठवलं आहे.

 

या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. पण तिच्या बोलण्यात विरोधाभास जाणवत आहे. त्यामुळं पोलिसांनी पाठवलेल्या पथकांच्या चौकशीतून काही ठोस समोर आल्यानंतरच याबाबत माहिती देता येईल असंही पोलीस अधीक्षक म्हणाले आहेत.

 

Published By- Priya Dixit

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top