राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठे – उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे
ठाणे /ज्ञानप्रवाह न्यूज- कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील खडकलाट गावचे श्री दत्त गगनगिरी ध्यान मंदिराचे मठाधिपती परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज यांनी आपल्या असंख्य अनुयायांच्या साथीने आज यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.या प्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासह सागर बागडी महाराज, नूतन धनावडे महाराज,बाळकृष्ण कांबळे महाराज,सुवेल शेट्ये महाराज,मयुर गुरव महाराज,साई पाटील महाराज,अनिकेत वरके महाराज, सुषमा खरात,दादा महाराज, दीपा फडणवीस,अरविंद शिराळकर,अजय घराडे महाराज यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठे असते असे मानणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे.माझ्या कडून जे शक्य होते तेच मी पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी आणि आध्यात्मिक गुरुंसाठी केले असल्याचे मी विनम्रपणे नमूद करतो असे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे म्हणाले तसेच हे कार्य यापुढेही करत राहू असेही अधोरेखित केले.आध्यात्मिक क्षेत्रात महाराष्ट्र आणि कर्नाटकात कार्यरत असतानाही आपण शिवसेनेच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून प्रवेश केलात हा शिवसेना पक्षाचा मी बहुमान समजतो.

याच आनंदआश्रमात साधू संतांचा कायम सन्मान करण्यात आला.इथेच त्यांचा यथोचित मानपान आमचे वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब करायचे.वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मराठी आणि हिंदुत्वाचा कायम पुरस्कार केला.हिंदुत्वाला दहशत वादाशी जोडण्याचा जो कट काँग्रेसने रचला होता तो न्यायालयाने हाणून पडला मात्र अशी कारस्थाने रचून हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आणायची वेळ आता आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

