या उपक्रमामुळे वेळ आणि पैशांची बचत होऊन समस्या लवकर सोडवण्यास मदत – न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी

वीर परिवार सहायता योजनेअंतर्गत धुळे येथे विधी सेवा चिकित्सालयचे उद्घाटन संपन्न

या उपक्रमामुळे वेळ व पैशांची बचत होऊन समस्या लवकर सोडवण्यास मदत – न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी

धुळे,दि.5 ऑगस्ट 2025 (जिमाका वृत्तसेवा) : देशाच्या संरक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या कार्यरत सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीय सदस्यांच्या कल्याणासाठी तसेच त्यांना विधी सहाय्य व सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी वीर परिवार सहायता योजना 2025 सुरु केली आहे.धुळे येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ‘विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

या उद्घाटनप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.मेजर निलेश पाटील (निवृत्त), सेवानिवृत्त कर्नल उत्तमराव पाटील, ग्रुप कॅप्टन अविनाश देवरे,विधी स्वयंसेवक माजी सैनिक सुनिल पाटील यांच्यासह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायाधिश प्रवीण कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने देशभरात सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी त्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हे विधी सेवा चिकित्सालय आठवड्यातून दर मंगळवारी व बुधवार असे दोन दिवस पूर्णपणे मोफत सेवा देणार आहे. विधी सेवा चिकित्सालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ ॲड.पुजन गुजराथी, ॲड चेतना पिसोळकर तसेच विधी स्वयंसेवक माजी सैनिक सुनिल पाटील हे विधी सहाय्य व सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी उपस्थित असतील.या सेवेमुळे माजी सैनिकांच्या कौटुंबिक, जमीन, पेन्शन आणि इतर कायदेशीर विषयावर मार्गदर्शन आणि न्यायालयीन कारवाईसाठी मदत मिळणार आहे. या उपक्रमामुळे वेळ आणि पैशांची बचत होऊन समस्या लवकर सोडवण्यास मदत होईल.तरी सैनिक,माजी सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी केले.

सेवानिवृत्त कर्नल उत्तमराव पाटील यांनी सांगितले की, सेवानिवृत्त सैनिकांना सैन्यदलाचे नियम माहित असतात परंतु भारतीय संविधानातील कलम 19 आणि 51र यासारख्या महत्त्वपूर्ण तरतुदींची माहिती नसते त्यामुळे त्यांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.मेजर निलेश पाटील यांनी चिकित्सालयाचे महत्त्व विषद करुन विधी सेवा चिकित्सालयामार्फत माजी सैनिकांना, विधवा पत्नी, वीरमाता आणि वीरपिता यांना कौटुंबिक आणि जमिनीशी संबंधित प्रश्नांवर त्वरित व मोफत मार्गदर्शन मिळणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पॅनल विधीज्ञ ॲड. पुजन गुजराथी यांनी केले.सूत्रसंचालन पॅनल विधीज्ञ ॲड.चेतना पिसोळकर यांनी केले. उपस्थित माजी सैनिकांनी या उपक्रमांचे स्वागत केले.

असा आहे योजनेचा उद्देश :

देशातील सैनिक कठीण परिस्थितीत देश सेवा करतात, बहुतेकदा त्यांच्या कुटूंबापासून आणि दूर, दुर्गम भागात आणि उच्च संघर्षग्रस्त भागात सैनिक तैनात असतात, त्यावेळी त्यांच्यावर अवलंबुन असणारे त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना त्यांचे कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना विधी सेवा मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या विधी चिकित्सालयात सरंक्षण कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांना मालमत्तेचे वाद, कल्याणकारी योजना, वैवाहिक वाद, दिवाणी वाद आणि इतर कायदेशीर बाबींमध्ये मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा आणि मदत देण्यासाठी केंद्रीय, राज्य आणि जिल्हा सैनिक कल्याण मंडळ येथे विधी चिकित्सालय यांची स्थापना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Back To Top