मंगळवेढ्यात वीजेच्या पोलवर काम करणार्या कंत्राटी लाईनमनचा शॉक लागून मृत्यू
नातेवाईकांनी प्रेत तब्बल तीन तास ठेवले वीज वितरण कार्यालयाच्या दारात
मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा शहरातील दामाजी कारखाना चौकातील मायाक्का मंदिराजवळ कंत्राटी लाईनमन (जनमित्र) अतिश जयराम लांडे वय वर्षे 28 हा रविवार दि.18 मे रोजी विद्युत खांबावर काम करत असताना शॉक लागून वरुन खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता.उपचार सुरु असताना बुधवार दि.21 मे रोजी सकाळी मयत झाला.तद्नंतर त्या कंत्राटी लाईनमनचे प्रेत नातेवाईकांनी मंगळवेढा येथील वीज वितरण कार्यालयाच्या उंबर्याजवळ तब्बल तीन तास ठेवून या घटनेचा संताप व्यक्त केला.
रविवार दि.18 मे रोजी 2 वाजता नागणेवाडी येथील मायाक्का मंदिर येथील विद्युत खांबा वर कामानिमित्त मयत अतिश लांडे हे चढले असता त्यांना विजेचा झटका लागून ते खाली पडले होते.सोलापूरातील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असताना ते मयत झाले.काम करत असताना अचानक विजेचा शॉक कसा काय बसला ? एका तरुण अविवाहित मुलाचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

अतिश जयराम लांडे यांच्या नातेवाईकांनी सोलापूरहून थेट मृतदेह वीज वितरण कार्यालयाच्या उंबर्यात दुपारी 1.30 वाजता आणून ठेवला. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला. ही घटना वार्यासारखी संपूर्ण जिल्हाभर पसरताच अधिकार्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.वीज वितरण कार्यालयात जवळपास एक हजार लोकांचा जनसमुदाय पाहून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्राणाही घटनास्थळी दाखल झाली होती. वीज वितरणचे जबाबदार अधिकारी मंगळवेढ्यात निवासी नसल्यामुळे यावेळी उपस्थितांनी आक्रोश केला. यापुर्वीही मनसेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांनी वीज वितरणला कुलूप लावण्याचा इशारा दिला असता अधिकार्यांनी आम्ही येथे राहणार म्हणून लेखी दिले होते. मात्र याचे अद्यापही पालन झाले नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारी दिवसभर वीज न जाता सुरळीत सेवा मिळाली. इतरवेळी मात्र दिवसभर अधून मधून वीज सेवा खंडीत होण्याचा प्रकार घडत असतो.उपस्थित राजकीय लोकांनी वीज वितरणच्या अधिकार्यावर दबाव टाकल्याने सुतासारखे सरळ होवून त्यांनी तात्काळ शासकीय व इतर योजनेतून आर्थिक मदत मयताच्या कुटूंबियांना करण्याचा निर्णय जाहीर केल्या नंतर कुटूंबियांनी मयताला अंत्यविधीसाठी घेवून गेले.
वीजेचे काम करत असताना वीज मंडळाच्या निष्काळजीपणा मुळे आत्तापर्यंत तीन लाईनमनला आपला जीव गमवावा लागला तर अन्य दोघे या घटनेत गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. एवढे घडूनही वीज वितरणच्या अधिकार्यांना जाग येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
