अक्कलकोट: (अक्कलकोट तालुका प्रतिनिधी)दि १२-अक्कलकोट तालुक्यातील दुधनी शहरातील नागोबा नगर भागात सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. गटारी तुंबल्या असून सांडपाण्याचे पाणी रस्त्यावर साचले आहे. ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांतील दगडमातीमुळे गटारी कोसळल्या आहेत, ज्यामुळे सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डास आणि जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या गंभीर समस्येकडे दुधनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागोबा नगर आणि वढार वस्तीतील संतप्त नागरिकांनी आता मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाची मागणी करणारे निवेदन नागरिकांनी दुधनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांना सादर केले आहे.
या निवेदनात नागरिकांनी सांगितले आहे की, साचलेल्या सांडपाण्यामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत आणि नागरिकांना, महिलांना व वृद्धांना ये-जा करण्यास प्रचंड त्रास होत आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
निवेदन सादर करतेवेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मानकर, लक्ष्मीपुत्र मानकर, अमरीष मानकर, मंजूनाथ मानकर, सातलिग मानकर, बसवराज माळी, भागेश गुळगोंड, लक्ष्मीपुत्र, रवि मानकर, सिध्दु कळसे यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.
यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री सैदप्पा झळकी यांनी याबाबत बोलताना सांगितले की, दुधनीच्या मुख्याधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून या अस्वच्छतेची समस्या तातडीने दूर करावी. अन्यथा, प्रभागातील महिला व नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावावर बोंबा बोंब आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.


