मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना तीन रुग्णवाहिका मिळाल्या
आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१२/२०२४ – रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी 108 या क्रमांकावर फोन केल्यास रुग्णवाहिका रुग्णापर्यंत येऊन दवाखान्यात उपचारासाठी दाखल करेल अशी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे . या सुविधेमुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील अनेकांचे प्राण वाचलेले आहेत.

मंगळवेढा,आंधळगाव ,मरवडे सलगर बुद्रुक, बोराळे ,भोसे या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत व उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाकडे घेऊन येत असलेल्या रुग्णवाहिका खराब झाल्या होत्या. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत अशी वारंवार तक्रार करण्यात येत होती. रुग्णांना त्यामुळे खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत होता.ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी प्रयत्न करून या अगोदर भोसे व आंधळगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर आता मरवडे ,बोराळे ,सलगर या आरोग्य केंद्रांनाही नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने रुग्णांना उपचारासाठी ताटकळत कुणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
सध्या नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे तर पंढरपूर ते विजापूर या महामार्गांच्या कामामुळे शहरातील वाहतूक वेगवान झाली आहे शिवाय या रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या देखील वाढली आहे .अशा परिस्थितीत एखादा अनर्थ घडला तर रुग्णाला तातडीने उपचारासाठी दाखल करणे गरजेचे असते. रुग्णवाहिकांची कमतरता असल्यामुळे ग्रामीण भागात एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णाला खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. खासगी वाहनांच्या भरमसाठ भाड्यामुळे रुग्णाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळे शासनाच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकांची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यकता होती त्यानुसार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून आणखी तीन आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ मदत मिळण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.
रुग्णवाहिका चालकांना 21 महिन्यापासून पगार मिळाला नसल्याची खंत
रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांना 21 महिन्यापासून पगार मिळाला नसल्याची खंत एका चालकाने आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संपर्क साधून चालकांच्या रखडलेल्या पगारावर तात्काळ मार्ग काढून त्यांचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.
पंढरपूर तालुक्यातही अशा रुग्णवाहिकांची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
