पोलीसांनी पकडला बठाण येथील भिमानदी पात्रातून बिगर पावती वाळू घेवून जाणारा टिपर
चालकाविरुध्द गुन्हा दाखल….
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : बठाण येथील भिमा नदी पात्रातून बेकायदा वाळू घेवून जाणारा टिपर पोलीस पथकाने जप्त केला असून टिपरसह अंदाजे 11 लाख 16 हजार रुपये किंमत होत असून चालक दत्तात्रय ज्ञानू करळे वय 42 रा.गोणेवाडी याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.वाळू ठेक्यातून शासकीय पावती न फाडता बिगर पावतीची वाळू वाहतूक होत असलेल्या तक्रारीवरुन पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहिम सुरु केली आहे.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी बिगर पावतीची वाळू वाहतूक करणार्या वाहनावर कारवाईची सुरु केली असून यासाठी पोलीसांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार हे पथक दि.25 मार्च रोजी 5.45 वाजता बठाण ते मंगळवेढा मार्गावर गस्त घालत असताना आवताडे सुत मिल जवळ हे पथक आल्यानंतर समोरुन एम.एच.13 ए.एक्स.3272 हा टिपर वाळू घेवून येत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने चालकाकडे हौद्यात काय आहे ? असे विचारणा केल्यावर वाळू असल्याचे सांगितले. तद्नंतर पथकाने टिपरची पाहणी केली असता हौद्यात चार ब्रास वाळू होती. टिपर चालकास सदर वाळू कोठून आणली व त्याची पावती आहे का ? असे विचारणा केली असता कोणताही परवाना व रॉयल्टी पावती नसल्याचे चालकाने सांगितले.
पथकास खात्री झाली की अवैधरित्या हा टिपर वाळू घेवून जात असल्याने भरलेला टिपर चालकासह पोलीसांनी ताब्यात घेवून जप्त केला. याची फिर्याद गोपनिय विभागाचे पोलीस हवालदार दिगंबर गेजगे यांनी दिल्यावर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. गाळमिश्रीत वाळू ठेक्यामधून शासकीय पावती न फाडता बिगर पावतीची अनेक वाळूची वाहने जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने स्वत: पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी भिमानदीकडे धाव घेवून कारवाई केल्याने पावतीशिवाय वाळू नेणार्या टिपर चालकांचे धाबे दणाणले असून अनेक टिपर चालक ब्रम्हपुरी व साखर कारखान्यामार्गे रिकामे टिपर घेवून जात असल्याचे दिसत होते.