पंढरपूर नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील अधिकाऱ्यां कडून नागरिकांची अडवणूक ?

पंढरपूर नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांकडून नागरिकांची अडवणूक ?

संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीची मागणी

उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांना दिले निवेदन

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०३/२०२५ :- पंढरपूर नगरपालिकेच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागाच्यावतीने विविध प्रकारचे दाखले देण्याकरिता तसेच जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्याकरिता व नोंदीतील दुरुस्तीकरिता नागरिकांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला असून अनेक नागरिकांनी काँग्रेसकडे तक्रारी दाखल केल्यानंतर पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांना निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की पंढरपूर नगरपालिके तील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभाग हा कायमच चर्चेत राहिलेला आहे. सध्या लाडकी बहीण योजना, विविध शालेय शिक्षण योजना तसेच शासकीय कामाकरिता नागरिकांना जन्माच्या दाखल्याची गरज भासते.याकरिता लोक दाखल्या साठी नगरपालिका कार्यालयात गेले असता नागरिकांना सदर नोंद उपलब्ध नाही. सदर रजिस्टर उपलब्ध नाही. हॉस्पिटल कडून नोंद करून आला किंवा हॉस्पिटलकडून नोंद आलेली नाही. तहसील कार्यालयातून ॲफिडिवेएट करून आणा अशा प्रकारची उत्तरे दिली जातात.वास्तविक पाहता जन्म आणि मृत्यूची नोंद करताना संगणकीय चुका होत असतात‌.या चुका दुरुस्त करण्याकरिता शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढून विविध निर्देश दिलेले आहेत.आरोग्य उपसंचालक यांचे परिपत्रक विचारात घेऊन संबंधित नोंदी दुरुस्त करता येतात मात्र सदर नोंद दुरुस्त करता येत नाही अशा प्रकारची उडवाउडवी ची उत्तरे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दिली जातात. याबाबत अनेक नागरिकांनी पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीकडे तोंडी तक्रार दाखल केली होती‌.

संबंधित अधिकारी आणि त्यांचे खाजगी हस्तक यांना लक्ष्मी दर्शन झाल्यानंतर पाहिजे तो दाखला दिला जातो,पाहिजे त्या पद्धतीने दुरुस्ती केली जाते असा अनुभव अनेक पंढरपूर करांना आला असल्याचे सांगण्यात येत आहे.सदर बाब गंभीर असून अभिलेख व्यवस्थापन कायदा 2006 आणि जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 2023/24 या नुसार नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजे. जन्माने मृत्यू नोंदणी विभागात विविध दाखल्यांकरिता व दुरुस्ती करिता येणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली पाहिजे याकरिता पंढरपूर शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकार्यांनी आज पंढरपूर नगरपालिके च्या उपमुख्याधिकारी यांच्या दालनात तळ ठोकला. उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांना संबंधित जन्म आणि मृत्यू निबंधक, अधिकारी आणि कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली तसेच त्यांना निवेदन देण्यात आले.

नागरिकांची अशाप्रकारे अडवणूक करणे व बेकायदेशीर पैशाची मागणी करणे ही बाब कदापिही खपवून घेतली जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांची त्वरित खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात यावी व चौकशीमध्ये ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.

यावेळी पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी,माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर,महेश अधटराव, सेवादलचे गणेश माने, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.

पंढरपूर नगरपालिकेचे जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागाचे अधिकारी पैसे घेऊन, लाच घेऊन काम करत असल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत सबळ पुरावे प्राप्त झाले आहेत.. सदर सबळ पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर अधीक्षक पुणे यांच्याकडे लवकरच सादर करणारा असून सदर पुराव्यानिशी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत रीतसर अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात येणार आहे.

पंढरपूर नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांकडून नागरिकांची अडवणूक ? याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून खुलासा व्हावा अशी अपेक्षा नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top