मंगळवेढा तालुक्यात शेत रस्ता अभियान राबविणार : तहसीलदार मदन जाधव
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०४/०३/२०२५ : शेत रस्ता हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. शेत रस्त्याअभावी जमीन पडीक राहणे,शेतीतून उत्पन्न कमी मिळणे तसेच शेत रस्त्यामुळे शेजारी,भावकीमध्ये वादविवाद ही नेहमीची समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून मंगळवेढा तालुक्यात शेत रस्ता अभियान राबविणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

या अभियानाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता हवा आहे किंवा इतर शेतकऱ्यांनी त्यांचा रस्ता अडवला आहे,अशा प्रकरणात संबंधित शेतकऱ्यांनी आपला अर्ज आपल्या मंडळ अधिकारी यांच्याकडे सादर करावा. अर्जावर स्पष्ट शब्दात शेत रस्ता अभियाना अंतर्गत अर्ज असे नमूद करावे.
मंडळ अधिकारी यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांची सर्वप्रथम छाननी करण्यात येईल.यामध्ये ज्या रस्त्यावर यापूर्वी न्यायालयात प्रकरण चालू असेल किंवा स्थगिती असेल अशी प्रकरणे वगळण्यात येतील. प्रथम आलेल्या अर्जानुसार संबंधित शेतकऱ्यांची त्यांच्याच शेतात बैठक घेऊन सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी शेतकऱ्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगण्यात येतील. तसेच शेत रस्त्याच्या प्रकरणात सामंजस्याने मार्ग काढण्यात येईल.यातूनही जे शेतकरी रस्ता देण्यास नकार देतील किंवा इतर शेतकऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या विरुद्ध अर्धन्यायिक प्रकरण चालवून रीतसर आदेश पारित करण्यात येईल.
मंगळवेढा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन आपला शेत रस्त्याचा प्रश्न सामंजस्याने निकाली काढण्यास हातभार लावावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.