तणावमुक्त जीवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली -डॉ.सचिन मर्दा

तणावमुक्त जीवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली -डॉ.सचिन मर्दा

सुप्रभात परिवाराच्यावतीने नामवंत वैद्यकीय तज्ञांचा सत्कार संपन्न

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- तणावमुक्त जीवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असून धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी सकाळी व्यायाम करणे व मित्र परिवाराच्या सोबत आपल्या भावभावना व्यक्त करत तणावमुक्त राहणे हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन कॅन्सर रोग तज्ञ डॉ.सचिन मर्दा यांनी केले. ते सुप्रभात मित्र परिवाराचा वसंतबाग आढीव येथे काळे परिवाराच्या वतीने आयोजित आयोजित केलेल्या सुसंवाद मेळावा व सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

सुप्रभात मित्र मंडळाचे मार्गदर्शक व सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे व कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी सुसंवाद मेळावा,स्नेहभोजन व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी पंढरपूरचे भूषण बालरोगतज्ञ डॉ.शितल शहा यांचा त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल, डॉ. सचिन सुभाष मर्दा यांनी कॅन्सर रोगाविषयी केलेले संशोधन व आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करत हजारो रुग्णांना जीवदान देण्यासाठी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल व सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन राजेंद्र शिंदे यांची कन्या रेश्मा आगवणे या अमेरिकेतील नामवंत औषध कंपनीमध्ये संशोधक म्हणून कार्य करत असलेबद्दल सुप्रभात मित्र परिवाराच्यावतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. सचिन मर्दा पुढे म्हणाले की कॅन्सर सारखा गंभीर आजार वेळीच निदान होऊन योग्य उपचार झाले तर बरा होऊ शकतो यासाठी योग्य उपचाराची गरज असल्याचे सांगितले. आपला आहार योग्य असेल व नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मित्रपरिवार सोबत असेल तर अनेक आजार टाळता येतात हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना सुप्रभात मित्र मंडळाचे मार्गदर्शक सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले की कुटुंबातील सुसंवाद कमी होत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सुप्रभात मित्रपरिवाराच्या माध्यमातून नियमित व्यायामाबरोबरच दररोज मित्र परिवारातील सदस्यांच्या भावभावनांना वाट मोकळी करून दिली जात असल्याने मानसिक आरोग्य चांगले राहत आहे याचाच फायदा शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी केले यामध्ये त्यांनी सांगितले की गेल्या 25 वर्षापासून सुप्रभात मित्रपरिवार नियमित व्यायामाबरोबरच सामाजिक उपक्रम राबवत असून रक्तदान शिबीर ,वृक्षारोपण,सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचे काम केले जात आहे.

या कार्यक्रमास मातोश्री मालनकाकू काळे,सुप्रभात मित्र परिवारातील जेष्ठ सदस्य देवानंद गुंड पाटील, दिनकर पाटील, सुभाष मर्दा शेठ,सुखदेव चव्हाण,उद्धव बागल,पोपट रेडे,आर. डी.पवार,अरविंद जाधव,राजेंद्र शिंदे, महादेव देठे, कागदे रावसाहेब, कवी रवी सोनार,राजेंद्र भोसले, राजेंद्र नरसाळे, राजेश भादुले, प्रशांत फराटे,यांच्यासह सर्व सुप्रभात मित्र मंडळाचे सदस्य सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर उपस्थित यांचे आभार मंडळाचे सचिव सोमनाथ देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top