आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेऊन प्रशासनात काम करावे – मंदार गोंजारी
स्पर्धा परीक्षेमध्ये मासाळवाडी येथील विक्रम शेंडगे व विरकरवाडी येथील अक्षदा विरकर यांची निवड झाल्याने त्यांचा अहिंसा पतसंस्था म्हसवड यांचेवतीने सत्कार
म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज-नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मासाळवाडी येथील विक्रम शेंडगे व विरकरवाडी येथील अक्षदा विरकर यांची निवड झाल्याने त्यांचा अहिंसा पतसंस्था म्हसवड यांचे वतीने भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना एबीपी माझा चे प्रतिनिधी व म्हसवड चे सुपुत्र मंदार गोंजारी यांनी वरील गौरवोदगार काढले.सातारा जिल्ह्यातील एकीकडे सगळे तालुके सुजलाम सुफलाम आहेत तर आपल्या माण तालुक्यातील पाणीच वेगळे आहे.याच तालुक्यात अनेकविध रत्नांची खाण आहे. हे येथील विद्यार्थ्यांनी वारंवात दाखवून दिले आहे. अनेक अधिकारी याच तालुक्याने महाराष्ट्राला आणि देशाला दिले आहेत. माण तालुक्यातील अनेक विद्यार्थांनी या परीक्षे मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
बोलताना पुढे ते म्हणाले कि मी आल्यापासून बघत होतो यश जरी आपण संपादित केल असलं तरी आनंद मात्र पालकांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता आणि ज्यांच्यामुळे आपण यश संपादित केले त्या आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेवून प्रशासनात काम करावे. म्हसवड सारख्या ठिकाणी कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या प्रत्येकाचा इथं सन्मान करून त्यांना शाबासकीची थाप देणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नितिन दोशी हे आहेत. त्यांच्या या आशीर्वादरुपी सत्काराने अनेकांना प्रेरणा मिळते व पुढील वाटचाल आदर्श व संघर्षमय करून यशाची शिखरे पार करतात.
या कार्यक्रमामध्ये प्रथम दिव्यांग असणारे विक्रम शेंडगे व अक्षदा विरकर यांचा मंदार गोंजारी यांचे हस्ते शाल व भेटवस्तू आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार स्कार्फ देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी संस्थेचे संचालक ऍड. भागवत, डॉ. मासाळ व महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे संचालक व आदर्श शिक्षक लुनेश विरकर हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि यश संपादन करताना करावा लागणार संघर्ष हा नक्कीच त्रासदायक असतो परंतु त्यातून मिळणारे यश हे मात्र अविस्मरणीय असते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी म्हणाले की, विक्रम व अक्षदा यांनी जे यश संपादित केले त्यांचे कौतुक तर आहेच पण त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये हे यश मिळवले ते मात्र वाखाणण्याजोगे आहे.विक्रम दिव्यांग असून त्याचे आई वडील मेंढपाळ आहेत.पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्याची निवड झाली होती. आर्थिक पाठबळ नसलेने त्याला मैदानी खेळ सोडून त्याने राज्यसेवेचा अभ्यास करून हे अभूतपूर्व यश संपादन केले आहे.दुसरीकडे अक्षदाच्या घरची परिस्थितीसुद्धा हालाखीचीच आहे.त्यामुळे राज्यसेवेची तयारी किंवा स्टडी सर्कल वगैरे न जाता घरूनच अभ्यास करून यश संपादित केले आहे.
सत्कारमूर्ती विक्रम शेंडगे म्हणाले की, माझी पॅरा ऑलिम्पिकसाठी दिव्यांगांमधून निवड झालेली पण आर्थिक पाठबल नसलेने मी एमपीएससी करून आर्थिक बाजू सक्षम करून मग पुढे जाईन.आर्थिक अडचणीत असताना माझे नातेवाईक माझा कॉल सुद्धा घेत नव्हते तेच नातेवाईक माझ्या यशाने मला पटकन कॉल करून शुभेच्छा देत आहेत. सांगायचं एवढंच आहे जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारनार नाही.

मनोगत व्यक्त करताना अक्षदा म्हणाली की,घरूनच अभ्यास करत होते, त्यामुळे घरच्यांचे हाल,गरिबी दिसत होती आणि एक दिवस सरकारी नोकरी मिळवून त्यांचे होणारे हाल थांबायचे आणि ते मी करून दाखवलं.
या कार्यक्रमप्रसंगी नारायण मासाळ पंच, भानुदास मासाळ, नवनाथ मासाळ, डॉ. सतीश मासाळ, कृष्णराज शेंडगे,सुखदेव मासाळ, पांडुरंग नरुटे, बिरूदेव नरुटे,नामदेव मासाळ, शशिकांत ढोले, महावीर विरकर, ज्ञानदेव मासाळ,अक्षदा चे आईवडील, अहिंसा पतसंस्थेचे संचालक महावीर व्होरा, विजय बनगर,अजित मासाळ मासाळवाडी व विरकरवाडी येथील ग्रामस्थ आणि अहिंसा पतसंस्थेतील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले.हरिदास मासाळ यांनी आभार मानले.