दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित गैरव्यवहार रोखण्यासाठी दूरसंवाद विभागाने केल्या उपाययोजना
नवी दिल्ली /PIB Mumbai,6 फेब्रुवारी 2025 –नागरिकांचे संरक्षण आणि सायबर गुन्हेगारी व आर्थिक गैरव्यवहार यासारख्या गुन्ह्यांमध्ये दूरसंवाद क्षेत्राच्या गैरवापराला आळा घालण्याच्या उद्देशाने दूरसंवाद विभागाने खालील उपाय योजना सुरू केल्या आहेत.

बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या संशयित मोबाईल क्रमांकांचा शोध घेण्यासाठी एक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे आणि दूरसंवाद सेवा पुरवठादारांना ग्राहकांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोबाईल वापरकर्त्यांना सक्षम बनविणे, त्यांची सुरक्षा मजबूत करणे आणि जागरुकता वाढविणे यासाठी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून संचार साथी हा उपक्रम सुरू करण्यात आला.हा उपक्रम वेब पोर्टल (https://sancharsaathi.gov.in) आणि मोबाईल ऍप या दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे.संचार साथी इतर बाबींसोबतच नागरिकांना खालील सुविधा उपलब्ध करुन देते.
संशयित फसव्या व अनपेक्षित व्यावसायिक संवादाबाबत तक्रार दाखल करणे
आपल्या नावावर असलेल्या मोबाईल क्रमांकांची माहिती घेणे व अनावश्यक किंवा न घेतलेल्या मोबाईल क्रमांकाबाबत माहिती देणे
चोरी झालेल्या / हरवलेल्या मोबाईल संचाचा वापर रोखणे व त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तक्रार दाखल करणे
आपल्या मोबाईल संचाच्या विश्वासार्हतेची खात्री करुन घेणे.
सायबर गुन्हेगारी व आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी दूरसंवाद संसाधनांच्या गैरव्यवहाराबाबतची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचविता यावी या उद्देशाने डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) सुरू करण्यात आला. सध्या बँक व वित्तीय संस्था, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), राज्ये/केंद्रशासित प्रदेश पोलिस, सुरक्षा यंत्रणा, भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र (I4C),टीएसपी यासारख्या 540 संस्थांनी डीआयपी चा उपयोग सुरू केला आहे.
भारतातील मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला असल्याचे दर्शवणारे परंतु फसवे असलेले आंतरराष्ट्रीय कॉल ओळखून ते रोखण्यासाठी दूरसंवाद विभाग आणि दूरसंवाद सेवा पुरवठादार यांनी एक प्रणाली तयार केली आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या खोटी डिजिटल अरेस्ट, फेडेक्स घोटाळा, कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडणे, सरकारी अथवा पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करणे, दूरसंवाद विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून मोबाईल सेवा बंद होण्याचा इशारा देणे यासारख्या घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी असे फसवे आंतरराष्ट्रीय कॉल्स केले होते.
नागरिकांना सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांविरोधात तक्रार दाखल करता यावी यासाठी केंद्रिय गृह मंत्रालयानेही राष्ट्रीय सायबर गुन्हेगारी तक्रार नोंदणी पोर्टल (https://cybercrime.gov.in) सुरू केले आहे.
दूरसंवाद कायदा 2023 च्या कलम 22 अंतर्गत दूरसंवाद यंत्रणांच्या सुरक्षेसाठी, दूरसंवाद विभागाने दूरसंवाद सायबर सुरक्षा नियमावली व दूरसंवाद पायाभूत सुविधा नियमावली अनुक्रमे 21.11.2024 व 22.11.2024 रोजी जारी केली. भारतीय दूरसंवाद यंत्रणेला असलेला संभाव्य सायबर धोका ओळखून संबंधितांना योग्य उपाययोजना करण्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यासाठी दूरसंवाद विभागाने दूरसंवाद सुरक्षा संचालन केंद्र (TSOC) स्थापन केले आहे. दूरसंवाद साधनांच्या माध्यमातून होणाऱ्या घोटाळ्यांबाबत जनजागृती करण्यासाठी दूरसंवाद विभाग समाज माध्यमांवरील संदेश आणि नियमित पत्रकांद्वारे नागरिकांशी संवाद साधत आहे.
दूरसंवाद राज्यमंत्री डॉ. पेम्मासनी चंद्रशेखर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.