शिक्षण, आरोग्य आणि समान विकासाची जी संधी संविधान देत आहे त्याच्या प्रती जागरूकता निर्माण केली पाहिजे – डॉ रावसाहेब पाटील

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,२६ जानेवारी २०२५-कामती सोलापूर येथील श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संकुलात पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ रावसाहेब पाटील यांच्या हस्ते ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ८.३० वाजता ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड.अर्जुन पाटील होते. याप्रसंगी प्रा.प्रकाश भोसले,गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आवताडे, पदाधिकारी , शिक्षक,गुरुकुलचे विद्यार्थी,कामतीचे सरपंच,प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ रावसाहेब पाटील यांनी भारतीय संविधान हे संपूर्ण जगात समता,बंधुभाव,न्याय प्रस्थापित करण्यासाठी आदर्श संविधान आहे असे सांगून भारतीय नागरिकांना जे मूलभूत हक्क, अधिकार आणि कर्तव्ये संविधानाने प्रदान केली आहेत त्याचा परिचय विद्यार्थ्यांनाही करून दिला पाहिजे.शिक्षण, आरोग्य आणि समान विकासाची जी संधी संविधान देत आहे त्याच्या प्रती जागरूकता निर्माण केली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. श्रीकृष्ण संस्थेच्या गुरुकुल शिक्षण प्रणालीचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षक व विद्यार्थ्याची भाषणे तथा कवायतीचे प्रयोग उपस्थितांसमोर सादर केले गेले.या गुरुकुलात पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.याच संस्थेनी सुरू केलेल्या राधा मुलींचे गुरुकुलासही डॉ पाटील यांनी भेट दिली.येथे १७० विद्यार्थिनिंसाठी अत्याधुनिक निवास आणि शिक्षणाची संस्थेने सोय केली आहे.

प्रिती भोजनाच्या कार्यक्रमानंतर डॉ रावसाहेब पाटील यांनी सांगोला येथे जाऊन दुपारी 3.30 वाजता माजी आमदार ऍड शहाजीबापू पाटील यांची ऍड अर्जुन पाटील आणि प्रा प्रकाश भोसले यांचे समवेत भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.त्यानंतर सायंकाळी माचणुर येथील भीमा नदीकाठच्या निसर्गरम्य अशा औरंगजेब बादशहाचे निवासस्थान आणि प्रार्थना स्थळ असलेल्या ऐतिहासिक स्थानी भेट देऊन तत्कालीन इतिहासाच्या आठवणींना उजाळा दिला.

या भीमेच्या तीरावर औरंगजेबाचा सुमारे चार वर्षे मुक्काम होता आणि येथूनच तो संपूर्ण भारताचा कारभार पाहत होता.या परिसरात शिवकालीन इतिहासाचे अनेक साक्षीपुरावे खंडित,दुर्लक्षित व जीर्ण स्वरूपात आजही अभ्यासकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे जतन,संशोधन,लेखन आणि प्रकाशन झाले पाहिजे.यासाठी पुरातत्व विभाग आणि इतिहास संशोधकानी लक्ष दिले पाहिजे असेही डॉ पाटील यांनी येथील प्रमुखांना आवाहन केले.