उजनी उजव्या कालव्यात उद्यापासून पाणी सुटणार – आ.समाधान आवताडे
उजनी कालवा सल्लागार समितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०१/२०२५ –उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने जादा पाणी नदीद्वारे व कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे.हे पाणी मंगळवेढा तालुक्यातील गावांना उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील मंगळवेढा तालुक्यातील गावांना सोडण्याची मागणी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केली असता उद्यापासून हे पाणी सोडण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ना.विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्पाच्या सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले आहेत.तसेच कालवा सल्लागार समितीची पुढची बैठक येत्या फेब्रुवारी महिन्यात घेऊन आता दिलेल्या निर्देशांची कशा पद्धतीने कार्यवाही झाली आहे याचा त्या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये आ.समाधान आवताडे यांनी गतवर्षी पाच पाण्याच्या पाळ्या मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न बहुतांशी नियंत्रणात राहिला होता त्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आणि संबंधित विभागाचे अभिनंदन केले.आतापर्यंत सदर बैठका या पुणे,मुंबई येथे घेतल्या जात होत्या परंतु चालू वर्षाची कालवा सल्लागार समितीची बैठक सोलापूर जिल्ह्यामध्येच होत असल्याबद्दल आमदार समाधान आवताडे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
या बैठकीमध्ये तालुक्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या मांडत असताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की,मंगळवेढा तालुक्यातील टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी अद्यापपर्यंत मिळत नाही ते मिळावे अशी त्यांनी मागणी केली. शिवाय कॅनॉल ची निर्मिती होऊन 25 वर्षे झाली कॅनॉल टेलच्या भागातील कॅनॉलची कामे पूर्वी निकृष्ट झाल्याने अजून शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. सदर कामाची व्यवस्थित डागडुजी करून आवश्यक दाबाने शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचीही त्यांनी मागणी केली. तालुक्यातील मरवडे, बोराळे डोणज,नंदुर,कर्जाळ,कात्राळ हुलजंती, ढवळस,मुढवी ,धर्मगाव, मंगळवेढा साखर कारखाना रोड या भागातील बहुतांश शेतकऱ्यांना आजही पाण्यासाठी झगडावे लागत आहे त्यामुळे त्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे.

भीमा नदीवरील को.प.बंधाऱ्यावरील खराब झालेले दरवाजे दुरुस्तीबाबत काही नियोजन झाले आहे ? असा आ.समाधान आवताडे यांनी सवाल उपस्थित केला असता संबंधित खराब झालेल्या दरवाजांपैकी जे दरवाजे जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या परिसरात असतील त्या निडलची त्या-त्या संबंधित कारखान्यांनी दुरुस्ती आणि वापर योग्य करावेत असे मंत्री ना.विखे-पाटील यांनी सांगितले असता सर्वांनी त्यास सहमती दर्शवली आहे.
यावेळी खा.धैर्यशील मोहिते पाटील,खा प्रणिती शिंदे,माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख,आमदार नारायण पाटील, आमदार राजू खरे,आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,जलसंपदा विभागाचे कपोले,खांडेकर,जलसंपदा अधीक्षक अभियंता धीरज साळे,धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजी काळुंगे, जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव, भारत पवार, जिल्हा लेबर फेडरेशन माजी संचालक सरोज काझी, राजन पाटील, विक्रांत पंडित तसेच संबंधित विभागाच्या विविध खात्याचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.