मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना देशात फुले दाम्पत्यांनी केली- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे

मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना महाराष्ट्रात,देशात फुले दाम्पत्यांनी केली- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : – महिलांचे अधिकार म्हणजेच मानवी अधिकार आणि मानवी अधिकार म्हणजेच महिलांचे अधिकार आहेत आणि याची स्थापना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी त्याकाळी केली. संयुक्त राष्ट्रसंघ आज जगामध्ये हेच मानवी मूल्य रुजवण्याचे काम करतोय ते काम या दाम्पत्यांनी त्याकाळी केले,असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी केले. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.यावेळी विद्यापीठा च्या मुख्य इमारती समोरील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, कुलगुरू प्रा.डॉ.सुरेश गोसावी आणि विद्यापीठ अधिकार मंडळाचे सदस्य आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

समाजाला जातीभेद, वंशभेद,स्त्री – पुरुष भेद या सगळ्या भेदाभेदांची टोचणी वाटण पुरेसे नसते तर त्यासाठी काहीतरी कृती करावी लागते असा संदेश सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी आयुष्यभर दिला. त्यामुळे प्रत्येकाने तशी कृतिशीलता आपल्यात निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या कार्यांना जसा सर्व जाती जमातीमधील काही लोकांचा विरोध होता तसेच या कार्यात त्यांना मदत करणारे लोकही सर्व समाजा तील होते. त्यामुळे समाजात वैचारिक सहिष्णुता निर्माण होणे गरजेचे आहे, असे डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी पुढे बोलताना सांगितले.

सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका तर होत्या परंतु त्या एक उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञही होत्या. मुलांनी शिक्षण सोडू नये यासाठी त्यांनी त्याकाळी स्टायपेंड सुरु केले होते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यांचा वसा कायम जपत आहे व यापुढेही जपत राहील आणि त्यांचा वसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे कुलगुरू प्रा.डॉ.सुरेश गोसावी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एमबीए विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले. प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ. ज्योती भाकरे यांनी सन्माननीय अतिथी यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. तर आभार सीएमए डॉ.चारूशीला गायके यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध कर्मचारी आणि विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top