जैन समाजाची देशात ओळख निर्माण करून प्रतिष्ठा अस्मिता प्राप्त करून देण्याचे महत्वपूर्ण कार्य मुनी विद्यानंद महाराजांनी केले – डॉ रावसाहेब पाटील

आचार्य विद्यानंद : धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान या विषयावर पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ रावसाहेब पाटील यांचे व्याख्यान

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज- नुकतेच निगडी पुणे येथील भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट आयोजित युगपुरुष भगवान आदिनाथ आणि उपसर्गविजयी भगवान पार्श्वनाथ जिनबिंब पंचकल्याणक महामहोत्सव प्रसंगी विश्वधर्म प्रणेते आचार्य विद्यानंद महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आचार्य विद्यानंद : धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान या विषयावर पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ रावसाहेब पाटील यांचे व्याख्यान झाले.

याप्रसंगी प.पू.अमोघकीर्तिजी महाराज आणि प.पू.अमरकीर्ती महाराज यांच्या हस्ते मासिक पत्रिका पंचरंग प्रबोधिनीच्या मुनी विद्यानंद अंकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. प्रास्ताविक ट्रस्ट चे अध्यक्ष अजित पाटील यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद फडे यांनी केले.चकोर गांधी,डी.ीए पाटील यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.या व्याख्यानास प. पू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारकांचे मंगल सान्निध्य तर कर्मवीर पतसंस्थेचे सागर चौगुले,संचालक मंडळाचे सदस्य,HND जैन बोर्डिंग चे सुरेंद्र गांधी,भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे शांतिनाथ पाटील,सुदिन खोत ,उमेश पाटील ,वीरेंद्र जैन,संजय नाईक आदींची उपस्थिती लाभली होती.यावेळी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुनी विद्यानंद यांच्या जीवन आणि कार्यास अभिवादन करून डॉ रावसाहेब पाटील यांनी मुनी विद्यानंदजी यांची विश्व धर्म संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की महाराजांचा विश्व धर्म कोणत्या मंदिर,मस्जिद,चर्च वा गुरुद्वारा पर्यंत सीमित नव्हता, कोणत्या जाती,संप्रदाय वा पंथाशीं संबंधित नव्हता तो धर्म कालांच्या परीघातही समाविष्ट होणारा नाही तर तो समस्त आत्म्याचा धर्म असून जीव मात्रांच्या कल्याणाचा अहिंसा धर्म आहे.डॉ पाटील यांनी सांगितले की जैन धर्मास लोकमान्यता, राज्यमान्यता आणि ऐतिहासिकता प्राप्त करून देण्याचे आणि जैन समाजाची देशात ओळख निर्माण करून प्रतिष्ठा आणि अस्मिता प्राप्त करून देण्याचे महत्वपूर्ण कार्य मुनी विद्यानंद महाराजांनी केले असून प्राकृत भाषा,प्राचीन भारतीय इतिहास, विज्ञान हे आचार्यांच्या आवडीचे अभ्यास विषय होते.आचार्यानी आपली सारी प्रतिभा, ताकत आणि शक्ती पणाला लावून चारही संप्रदायाला निर्विवाद मान्य असलेला जैन ध्वज ,ध्वजगीत,जैन बोधचिन्ह,समनसुत्तं जैन ग्रंथ,देशभर धर्म चक्राचे प्रवर्तन,महावीर जीवनावर शेकडो पुस्तके‌,पोवाडे, अंक,चित्रे आदींसाठी लेखक आणि कलाकारांना प्रेरणा देऊन ज्या कलाकृती तयार करून घेतल्या, तसेच शहरा शहरात महावीर उद्यान महावीर कीर्तिस्तंभ , ग्रंथालय निर्माण करून मोठी प्रभावणा केली.२५०० वा महावीर महावीर निर्वाण महोत्सव,गोमटेश्वर बाहुबली सहस्रब्धी महोत्सव,कुंदकुंद भारती प्राकृत भवन,सम्राट खारवेल ग्रंथालय,भगवान महावीर जन्मभूमी वासोकुंड वैशाली,कुंभोज बाहुबली क्षेत्र संरक्षण, गोमटगिरी क्षेत्र निर्मिती, देशातील अनेक प्राचीन जैन क्षेत्रांचा जीर्णोद्धार,आचार्य कुंदकूंद रचीत समयसरदी ग्रंथ संशोधन, लेखन,प्रकाशन, इतिहास संशोधन लेखन आणि प्रकाशन अशी अनेक अविस्मरणीय कार्य केली आहेत ती जैन समाजाला विसरता येणार नाहीत.मुनी विद्यानंद महाराजांचे वक्तृत्व प्रभावी,लेखन मूलगामी, संदर्भ समृद्ध असून ते कुशल आयोजक,संघटक आणि न्यायप्रिय होते.२२ एप्रिल १९२५ लां जन्म आणि २२ सप्टेंबर२०१९ रोजी मुनी विद्यानंद जी महाराज यमसल्लेखनापूर्वक समाधिस्त झाले.सुरेंद्र कल्लाप्पा उपाध्ये यांचा जीवन प्रवास शेडबाल (कर्नाटक) येथून सुरू होऊन क्षुल्लक पार्श्वकीर्ती,मुनी विद्यानंद,उपाध्याय मुनी विद्यानंद, एलाचार्य मुनी विद्यानंद, सिध्दांत चक्रवर्ती मुनी विद्यानंद,आचार्य मुनी विद्यानंद आणि श्वेतपीछाचार्य मुनी विद्यानंद अशा विविध पदव्या आणि उपाधिंनी अलंकृत मुनी विद्यानंदांचे स्वाध्याय आणि साधनामय जीवन राजधानी दिल्ली येथील कुंदकुंद भवनाच्या तपोभुमित विसावले, अजरामर झाले.जैन धर्म,जैन साधू,जैन इतिहास,भाषा, समाज,कार्यकर्ते,अभ्यासक, राजकारण,समाजकारण,जैन संस्था,ट्रस्ट अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रासाठी आदर्श मार्गदर्शन केले आहे.मुनी विद्यानंद जींच्या कार्यावर अनेक व्याख्यान देता येईल.जैन धर्म आणि समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुनी विद्यानंद आणि त्यांचे कार्य समजावून घेणे आणि सांगणे ही आजची गरज असल्याचे डॉ रावसाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले .

अशांत ,भयभीत,दिशाहीन,हिंसक आणि स्वार्थी समाजाला, देशाला ,विश्वाला मुनी विद्यानंद महाराजांचे विचार संजीवक ठरतील असा विश्वास व्यक्त करून डॉ पाटील यांनी मुनी विद्यानादांच्या स्मृतींना अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top