स्पर्धात्मक व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल-उद्योजक सुरज डोके
स्वेरीत अविष्कार-२०२४ हा उपक्रम संपन्न
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/१२/२०२४ – अविष्कार- २०२४ सारख्या स्पर्धात्मक व्यासपीठाच्या माध्यमातून संशोधनातील वेगवेगळे प्रकल्प तयार होतात. यामध्ये विद्यार्थी हे एकरूप होऊन प्रकल्पांची निर्मिती करत असताना वेगळी ऊर्जा तयार होत असते. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट हे स्पर्धेच्या रूपाने साकार होत असतात.अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल होते म्हणून अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मनापासून सहभागी व्हावे. अभियांत्रिकी क्षेत्रात प्रोजेक्टमुळे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल होते, असे प्रतिपादन स्पार्टन सोलर टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक उद्योजक सुरज डोके यांनी केले.

गोपाळपुर ता.पंढरपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या सूचनेनुसार महाविद्यालय स्तरीय अविष्कार २०२४ चे आयोजन केले होते.या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमा चे माजी विद्यार्थी व माचनूर मधील स्पार्टन सोलर टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक उद्योजक सुरज डोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
विशेष अतिथी म्हणून भारत फोर्ज कंपनी’चे एच.आर.जितेंद्र झोपे हे होते.दीपप्रज्वलना नंतर प्रा.के.पी.कौंडूभैरी यांनी प्रास्ताविकात ‘अविष्कार २०२४’ या एकदिवसीय संशोधनात्मक उपक्रमाबद्दल सहभागी संशोधक, स्पर्धक, प्रकल्पांचा विषय व नियम व अटी याबाबत सविस्तर माहिती दिली.
भारत फोर्ज कंपनीचे एच.आर.जितेंद्र झोपे म्हणाले की, कोणत्याही विषयाची मूलभूत माहिती ही पक्की असेल तर प्रोजेक्ट बनविण्यास अडथळा येत नाही. अविष्कार सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते. आजचे परिश्रम हे उद्याचे समाधान असते यासाठी आपल्या कामासाठी वेळ काढा आणि परिश्रम करा, याचे फळ निश्चित मिळेल असे सांगून कंपनीमध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेमके कोणते गुण आवश्यक असतात याची माहिती दिली.

यावेळी अभियांत्रिकी, कॉमर्स,एमबीए, पीएचडी अशा पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील जवळपास ६० संशोधक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्प हे पोस्टर व प्रकल्पाद्वारे अभ्यासपूर्ण मांडले होते. यामध्ये संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी विविध विषयांवर संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. दिग्विजय रोंगे यांनी काम पाहिले. परीक्षक म्हणून संशोधन अधिष्ठाता डॉ.ए.पी.केने,डॉ. सुमंत आनंद, डॉ.बादल कुमार, प्रा.पी.ए. सातारकर आदी तज्ञ प्राध्यापकांनी काम पाहिले. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या ‘अविष्कार-२०२४’ या स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये भारत फोर्ज या कंपनीचे भारत शेळके, महेश माळी, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार यांच्यासह इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांकडून सहभागी प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमा मधून उत्तीर्ण झालेले उद्योजक सुरज डोके यांनी दुसरीकडे नोकरी न करता स्वतःच उद्योग-व्यवसाय सुरु केला असून विद्यार्थ्यांच्या प्रकल्पामधील गुणवत्ता पाहून भारावून गेले.ते म्हणाले, तुम्ही भविष्यात इतरत्र जाऊन नोकरी करण्यापेक्षा इतर सहकाऱ्यांच्या हातांना देखील काम, रोजगार कसा मिळेल याकडे लक्ष देवून उद्योजक व्हा.
