तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र आंचल अध्यक्षपदी मिहीर गांधी यांची बिनविरोध निवड
अकलूज/ज्ञानप्रवाह न्यूज – जैन तीर्थक्षेत्राचे विकास आणि रक्षण – करण्यासाठी श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी काम करत असून, या कमिटीचे महाराष्ट्र अंचलच्या अध्यक्षपदाची प्रक्रिया मागील दोन महिन्यापासून सुरू होती. रविवारी दहिगाव येथे सर्वसाधारण सभेत निवड प्रक्रिया पार पाडली.सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मिहीर गांधी यांची पाच वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. याबाबत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर काळे यांनी केली.

रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी अतिशय क्षेत्र दहीगाव येथे भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र आंचल ची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी सभेसाठी उपस्थित श्रावकांनी दहीगाव क्षेत्र मूलनायक भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेचा पंचामृत अभिषेक केला.
श्री. जंबुकुमार गौतमचंद दोशी गुरुकुल च्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेची सुरुवात डॉ.महावीर शास्त्री यांच्या मंगलाचरणाने झाली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.अतिशय क्षेत्र दहिगाव जैन मंदिर ट्रस्टचे बाहुबली चंकेश्वरा यांनी मंदिर समितीच्यावतीने सर्व मान्यवर व सभासदांचे स्वागत केले तसेच तीर्थक्षेत्र कमिटीच्या वतीने डॉ. महावीर शास्त्री यांनी प्रस्तावना केली.
याप्रसंगी मुंबई,पुणे,परभणी,छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, फलटण, बारामती, निरा, अकलूज, म्हसवड, नातेपुते, आष्टी, मिरजगाव, अहमदनगर, वडगाव, टेंभुर्णी, मोडनिंब, पंढरपूर, इंदापूर, पुणे यासह सर्व महाराष्ट्रातून सभासद उपस्थित होते. मंदिर समिती व तीर्थक्षेत्र कमिटीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
मावळते अध्यक्ष अनिल जमगे यांनी त्यांच्या कार्यकालामधील केलेल्या कामाचा आढावा वाचून दाखवला.सदर सभेत रमणिकभाई कोठाडिया,डॉ विकास शहा वालचंदनगर, रविंद्र देवमोरे,महेंद्र शहा मुंबई,सुजाताताई शहा पुणे , पवन अंबुरे परभणी , सौ कांचनमालाताई संघवे लातूर,डॉ श्रेणिक शहा इंदापूर यांनी मार्गदर्शन करून तसेच म्हसवड येथील श्री सन्मती सेवा दल माजी अध्यक्ष डॉ राजेश शहा, सचिन देशमाने, अमित शहा मोडलिंब, संतोष दोशी, प्रवीण दोशी,डॉ रवींद्र मोडसे, शशिकिरण देशमाने, नीरज होरा, मयूर शहा, राजेंद्र गाडे व सम्मेद शहा यांनी नूतन अध्यक्ष मिहीर गांधी यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर नूतन अध्यक्ष मिहीर गांधी यांनी पुढील पाच वर्षातील कामाचे नियोजन कसे करणार हे सांगितले आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी तीर्थक्षेत्र कमिटीचे सभासद होण्यासाठी आवाहन केले.
सभेच्या शेवटी विविध संस्थांच्यावतीने नूतन अध्यक्ष मिहिर गांधी यांचा सन्मान करण्यात आला.आलेल्या सर्व सभासदांसाठी नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दहिगाव जैन मंदिर ट्रस्ट समिती सदस्य तसेच श्री सन्मती सेवा दलाचे सर्व आजी- माजी अध्यक्ष, संचालक व सभासदांनी सहभाग नोंदवला. प्रा.मनीष शहा यांनी सूत्रसंचालन केले.