सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे,जिमाका – राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावावीत,असे निर्देश दिले असून त्याप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करीत आहेत.पर्यावरणाचे संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे,ही भविष्याची गरज आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे एक पेड माँ के नाम अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

एक पेड माँ के नाम या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे,असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले.

ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री हरित ठाणे एक लक्ष वृक्ष लागवड या अभियानांतर्गत एक पेड माँ के नाम या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,लोकमान्य नगर येथे वृक्षारोपण करून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त शंकर पाटोळे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक उदय ढगे,वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, माजी नगरसेवक हणमंत जगदाळे,एकनाथ भोईर,दिगंबर ठाकूर, विहंग सरनाईक, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, आशा डोंगरे, वनिता घोगरे, प्राजक्ता खाडे, वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्य नम्रता भोसले तसेच ग्रीन यात्राचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व महापालिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून आतापर्यंत ठाणे महापालिकेने सर्वाधिक म्हणजे ६१ हजार झाडे लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचे विशेष अभिनंदन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांसाठी ही योजना सुरू केल्याबद्दल लोकमान्य नगरमधील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top