आरोग्य सेवेच्या प्रश्नांवर खासदार प्रणिती शिंदेनी उठवला आवाज

आरोग्य सेवेच्या प्रश्नांवर खासदार प्रणिती शिंदेनी उठवला आवाज

प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार सोनोग्राफी इसीजी ची सुविधा

नवी दिल्ली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26 जुलै 2024- सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या लोकसभेमध्ये जनतेच्या विविध मुद्द्यांवरती सातत्याने आवाज उठवत आहेत.शुक्रवारी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाला वाचा फोडली.

सोलापूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयां मध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे.ईसीजी, सोनोग्राफी मशीन यासारख्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांना प्रश्न विचारला.

खासदार प्रणिती शिंदे या सोलापूर मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेत आहेत.

शुक्रवारी त्यांनी संसदेच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नांच्या काळामध्ये त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळणाऱ्या सोयी सुविधामध्ये वाढ करण्याबाबतचा मुद्दा उपास्थित केला.

यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की,देशात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक सरकारी रुग्णालये आहेत.ज्यामध्ये सोयी सुविधांचा अभाव आहे.या ठिकाणी सोनिग्राफी,इसीजी या सारख्या सुविधा उपलब्ध नाहीत.त्यामुळे अनेक लोकांना शहरातील सिव्हील हॉस्पिटल येथे यावे लागते.साधे दिव्यांग दाखल्या करीतादेखील दिव्यांग व्यक्तींना शहरातील सिव्हिल रुग्णालयास भेट द्यावी लागते. दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी जे संकेतस्थळ आहे तेही मागील तीन महिन्यापासून बंद पडले आहे.त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

साधा ईसीजी काढण्याकरिता नागरीकांना सिव्हील हास्पिटल येथे यावे लागते.त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून येणाऱ्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत का ? असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांना विचारला.

यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य सुविधा देण्याबाबत सरकार कटिबद्ध असून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशाप्रकारे मिळतील यासाठी प्रयत्न केले जातील तसेच सरकारने जी व्यवस्था केली आहे यात प्राथमिक आरोग्य केंद्रामधून 106 औषधे मोफत देत आहोत आणि 14 तपासणी मोफत करीत आहोत.

उपजिल्हा रुग्णालयमध्ये 172 औषधे मोफत दिली जातात आणि 63 विविध तपासणी मोफत केल्या जातात. कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये 300 औषधे मोफत देत आहोत आणि 97 विविध तपासण्या मोफत केल्या जातात. याशिवाय जिल्हा रुग्णालयांमध्ये 381 औषधे मोफत देत आहोत आणि 134 विविध तपासणी मोफत केल्या जातात. सामान्य जनतेला हॉस्पिटलमध्ये विविध सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन यावेळी सरकारकडून देण्यात आले.ग्रामीण भागा तील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रांवरती अपंग प्रमाणपत्र यासारख्या सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मध्यंतरी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांसह इतर स्टाफ उपलब्ध नसल्याने उपचार होऊ शकत नाहीत आणि प्राथमिक स्वरूपाची औषधेही कमी प्रमाणात उपलब्ध आहेत याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top